मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांच्या वार्डनिधीला कात्री, पुणे महापालिकेत गदारोळ

राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांच्या वार्डनिधीला कात्री, पुणे महापालिकेत गदारोळ

Pune Muncipal213

09 जून : पुणे मनपाच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांच्या वार्ड निधीला कात्री लावल्याच्या कारणावरून पुणे महापालिकेत काल चांगलाच गदारोळ झाला. अश्विनी कदम यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेविकांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या दिला. त्यामुळे पालिका सभागृहात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असं चित्र निर्माण झालं होतं. या दरम्यान निधीच्या वर्गीकरणाला मान्यता देणार्‍या सत्ताधार्‍यांचा अग्नीच्या साक्षीने निषेध करण्यासाठी म्हणून सभागृहात चक्क कापूर पेटवण्यात आल्यानं आणखीनच गोंधळ उडाला. सभागृहात बराच वेळ गोंधळ घातल्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेविकांनी सभात्याग केला. त्याच दरम्यान अश्विनी कदम यांच्या समर्थकांनी सभागृबाहेर आंदोलन करून सत्ताधार्‍यांचा निषेध केला.

मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अश्विनी कदम यांच्या वार्ड स्तरीय निधीतून 63 कोटी 75 लाखांच्या निधीच वर्गीकरण करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे महापालिकेच्या सर्व साधारण सभेत त्याला मान्यता देण्यात आली. सभा सुरू असताना अश्विनी कदम या एका भाजाप नगरसेविकेसोबत चर्चा करण्यासाठी सभागृहाबाहेर गेल्या होत्या. नेमके त्याच वेळी हा विषय उपस्थित करून वर्गीकरणाला मान्यता देण्यात आल्यानं कदम कमालीच्या चिडल्या आहेत. त्याचे पडसाद आज दुसर्‍या दिवशीच्या सभेत उमटले. महापालिकेतील या प्रकारामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा उघड झालीय. पुणे महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. महापौर, सभागृह नेता तसंच स्थायी समिती अध्यक्ष राष्ट्रवादीचेच आहेत. असं असताना महापालिकेतील असा गदारोळ झाल्यानं सार्‍यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीसाठी मात्र ही निश्चितच चिंतेची बाब आहे.

दरम्यान, पालिकेतल्या निधी वाटपाच्या निमित्ताने पुणे राष्ट्रवादीतला पक्षांतर्गंत वादही पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. पक्षाच्या शहर अध्यक्षा वंदना चव्हाण यांनी त्यांच्याच पक्षाचे शहर कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या घरासमोर महिलांना घेऊन धरणे आंदोलन केलं. तसंच नुकत्याच झालेल्या पक्षांतर्गंत मिटींगमध्ये महिलांना डावललं जात असल्याचा आरोप केला आहे. पण या सगळ्यावादाबाबत कॅमेर्‍यासमोर मात्र, त्याबोलायला तयार नाहीयेत. त्यामुळे या आंदोलनामागचं नेमकं कारण काय हे कळायला मार्ग नाही आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Follow @ibnlokmattv


First published:

Tags: Pune Muncipal corporation