मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर विरोधी बाकावर बसणार-ठाकरे

राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर विरोधी बाकावर बसणार-ठाकरे

    uddhav_bjp_ncp09 नोव्हेंबर : भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा चालेला का ? हे भाजपने अगोदर स्पष्ट करावे आणि जर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर शिवसेना विरोधी बाकावर बसेल अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. तसंच हिंदुत्वावादी शक्तींचं विभाजन होऊ नये अशी आजही आमची इच्छा असून हिंदुत्वाला कायम साथ देणार असं सांगत पाठिंब्याचा निर्णय भाजपच्या कोर्टात टोलावलाय.12 नोव्हेंबर रोजी विधानसभेचा अध्यक्षाची निवड झाल्यावरच पाठिंब्याचा निर्णय जाहीर करणार असंही उद्धव यांनी स्पष्ट केलं. विरोधी गटनेतेपदी आमदार एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली अशी घोषणाही उद्धवंनी केली.

    शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही यावरुन गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर आज पडदा पडेल अशी शक्यता होती. पण, आता घोळात घोळ आणखी वाढला आहे. शिवसेनेनं आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीवर बहिष्कार टाकून एनडीएतून बाहेर पडण्याचे संकेत दिले. शपथविधीवर बहिष्कारनंतर सेनेच्या नेत्यांची 'मातोश्री'वर बैठक झाली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे सेनेच्या सर्व आमदारांची सेनाभवनात बैठक पार पडली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन नवी भूमिका स्पष्ट केली.

    आजपर्यंत काय घडलं कसं घडलं हे सगळ्यांना माहिती आहे. पण निवडणुकीच्या काळात हिंदुंना संपवणारी ताकद फोफावत चालली आहे. त्यामुळे आजही आमची लढाई तिच असणार आहे. हिंदुत्ववादी शक्तींचं विभाजन होऊ नये, ही आजही इच्छा आहे. त्यासाठी आमची हिंदुत्वाला कायम साथ राहिलं. पण भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टचारवादी म्हणून टीका केली. त्यांचा पाठिंबा तुम्हाला चालेल का ? हे अगोदर स्पष्ट करावे असा खडासवाल उद्धव यांनी भाजपला विचारला. जर भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार असतील तर आम्ही विरोधी बाकावर बसू अशी घोषणा उद्धव यांनी केली.

    सत्तेसाठी लाचार पत्कारून सत्तेत सहभागी होणार नाही. आम्ही काय निर्णय घ्यायचा आणि काय निर्णय नाही घ्यायचा यासाठी आम्ही कुणाला बांधिल नाही. त्यामुळे अगोदर भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी. 12 नोव्हेंरबरला विधानसभेचा अध्यक्षाची निवड झाल्यावर कुणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय स्पष्ट करू अशी स्पष्टोक्ती उद्धव यांनी दिली. सुरेश प्रभूंनी ऐनवेळेवर त्यांनी सेनेला पाठ दाखवली.प्रभूंचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय अत्यंत दुर्देवी आहे अशी खंतही उद्धवंनी व्यक्त केली. शपथविधीवर बहिष्कार टाकल्यानंतर सेना एनडीएमधून बाहेर पडले का ? अनंत गीते राजीनामा देतील का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता गीतेंचा निर्णय लवकरच स्पष्ट होईल असं उद्धव यांनी स्पष्ट केलं.

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    [if0] Follow @ibnlokmattv[sc0]

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    First published:

    Tags: NDA, Shiv sena, Udhav thakarey, उद्धव ठाकरे, एनडीए, भाजप, शिवसेना