16 नोव्हेंबर : सचिनSS…सचिनSS…हा चाहत्यांचा जयघोष आयुष्यभर माझ्या कानात गुंजत राहिन..मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे गुडबाय…हे शब्द होते मास्टर ब्लास्टर, विक्रमादित्य, क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरचे..आपल्या सचिनचे.. अत्यंत भावूक होतं सचिनने आज क्रिकेटविश्वाचा निरोप घेतला.
ज्या मैदानानं घडवलं त्या मैदानातून बाहेर पडताना क्रिकेटच्या या महानायकालाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. सचिनच्या डोळ्यात अश्रू पाहुन चाहत्यांचेही डोळे पाणावले होते. भारतीय टीमनं सचिनला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला, तर स्टेडिअममध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक क्रिकेटप्रेमींनी उभं आपल्या लाडक्या सचिनला मानवंदना दिली. 200 टेस्ट मॅच आणि तब्बल 328 इनिंग खेळणार्या सचिनची बॅट अखेर आज थांबलीय.
सचिनचं निरोपाचं भाषण
‘24 वर्षांच्या माझ्या अविस्मरणीय प्रवासात मला सर्वांचा पाठिंबा मिळाला. क्रिकेट चाहत्यांचे मी मनापासून आभार मानतो. आई, भाऊ, बहीण आणि कुटुंबीयांचा मला मोठा पाठिंबा मिळाला. निवड समितीनं माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि बीसीसीआयनं माझ्या निर्णयांवर विश्वास ठेवल्यानं मी त्यांचा आभारी आहे. एमसीएवर माझं खूप प्रेम आहे. इथंच मी माझ्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. माझे कोच आचरेकर सरांनी माझ्या सर्व मॅचेस पाहिल्या. ‘वेल प्लेड’ असं गेल्या 19 वर्षांत त्यांनी मला कधीच म्हटलं नाही. पण आज ते म्हणू शकतात.’