मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मल्टिप्लेक्सवाले 'बाजू', उद्या फक्त दगडू आणि प्राजू !

मल्टिप्लेक्सवाले 'बाजू', उद्या फक्त दगडू आणि प्राजू !

tp 2 news30 एप्रिल : मल्टिप्लेक्स विरुद्ध मराठी सिनेमा या वादात मराठी सिनेमाची सरशी झालीये. IBN लोकमतने या वादाला वाचा फोडल्यानंतर अखेर मल्टिप्लेक्सचालकांनी नमतं घेतलं असून एस्सेल व्हिजनच्या 'टाइमपास - 2' या सिनेमाला पहिल्या आठवड्यात इतर भाषिक सिनेमांप्रमाणेच उत्पन्नाचा वाटा वाढवून मिळणार आहे. आता उद्या 'टाइमपास-2' साठी मल्टिप्लेक्सची दारं उघडी राहणार आहे.

टाइमपास टू मल्टिप्लेक्समध्ये रिलीज करण्यावरुन प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. रवी जाधव दिग्दर्शित टाइमपास टू हा सिनेमा उद्या 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी रिलीज होतोय. पण  सिनेमॅक्स, ऍडलॅब्ज अशा प्रमुख मल्टिप्लेक्ससोबत अजूनही वाटाघाटी सुरू होती. हिंदी सिनेमांना पहिल्या आठवड्यात उत्पन्नाच्या 55 टक्के, दाक्षिणात्य सिनेमांना 50 टक्के मिळत असताना मराठी टाइमपास टू ला 45 टक्के का, असा सवाल निर्मात्यांनी उपस्थित केला होता. पण, मल्टिप्लेक्सचालकांनी आपली आठमुठी भूमिका कायम ठेवली होती.

त्यामुळे याच मुद्दयावरुन चर्चा पुढे सरकत नव्हती. याच मुद्द्यावरून एस्सेल व्हिजन आणि मल्टिप्लेक्स चालक यांच्यामध्ये एकमत होत नव्हतं. म्हणून एस्सेल व्हिजननं आक्रमक पवित्रा घेत आम्हाला योग्य वाटा मिळाला नाही तर, मल्टिप्लेक्समध्ये आमचा सिनेमा रिलीज करणार नाही अशी भूमिका घेतली. आणि ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे मल्टिप्लेक्स चालकांनी नमतं घेतलंय.

आयबीएन लोकमतने या वादाचा वाचा फोडल्यानंतर काही तासांत मल्टिप्लेक्सचालकांनी नमती भूमिका घेतली आणि टाईमपास - 2 ला पहिल्या आठवड्यात कमाईमध्ये 48 टक्के वाटा द्यायचं कबूल केलं. त्यामुळे आता शुक्रवारी टाइमपास -2 मल्टिप्लेक्समध्ये रिलीज होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा निर्णय मराठी सिनेमा आणि निर्मात्यांसाठी महत्त्वाचा विजय मानला जातोय. या लढाईत आयबीएन लोकमतने साथ दिल्याबद्दल एस्सेल व्हिजेनने आभार मानलेत.

सिंगल स्क्रिन थियटरबाहेर रांगाच रांगा

दरम्यान, संध्याकाळी टाईमपास टू हा सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित होणार की नाही याची खात्री नसताना स्क्रिन थिएटर्समध्ये मात्र त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. मुंबईतल्या प्लाझा थिएटरबाहेर या सिनेमाचं तिकिट मिळवण्यासाठी प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पहायला मिळालं. काहीही करून या सिनेमाचं तिकिट मिळवण्यासाठी उन्हाचीही तमा न बाळगता प्रेक्षकांनी रांगा लावल्याचं चित्र पहायला मिळत होतं. दगडू आणि प्राजू यांच्या आयुष्यात पुढे नक्की काय होतं ते जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

त्यामुळे मल्टीप्लेक्समध्ये पहाता येणार नसला तरीही सिंगल स्क्रिनमध्ये हा सिनेमा पहायला प्रेक्षकांनी गर्दी केलीय. टाईमपास टू या सिनेमाला नक्की कसा प्रतिसाद मिळतोय हे जाणून घेण्यासाठी प्लाझा चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांशीही आम्ही चर्चा केली. टाईमपासच्या पहिल्या भागापेक्षाही या भागाबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असल्यानं या चित्रपटगृहात टाईमपास टू या सिनेमाचे दोन ऐवजी तीन खेळ चालवण्यात येणार अशी माहिती प्लाझा थिएटरचे व्यवस्थापक योगेश मोरे यांनी दिली.

काय होता वाद ?

सिनेमॅक्स, ऍडलॅब्ज अशा प्रमुख मल्टिप्लेक्समध्ये हिंदी सिनेमांना पहिल्या आठवड्यात उत्पन्नाच्या 55 टक्के, दाक्षिणात्य सिनेमांना 50 टक्के मिळतो पण मराठी सिनेमा टाइमपास टू ला 45 टक्के वाटा देण्याची भूमिका मल्टिप्लेक्सचालकांनी मांडली. यावरच निर्मात्यांनी आक्षेप घेतला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Prathmesh Parab, Priya bapat, Priyadarshan Jadhav