17 ऑक्टोबर : कोळसा खाण वाटप प्रकरणी सीबीआयनं उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केल्यानंतर सरकार आता डॅमेज कंट्रोलच्या कामाला लागलंय. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यासाठी वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांना उद्योग जगताशी संवाद साधायला सांगितलंय. सीबीआयनं बिर्लांवर आरोपपत्र ठेवल्यानंतर उद्योगपतींमध्ये नाराजीचं वातावरण आहे, आणि ही बाब देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक असल्याचं आनंद शर्मा यांनी सीएनएन-आयबीएन (CNN IBN)शी बोलताना म्हटलंय. दरम्यान, कॉर्पोरट अफेअर्स मंत्री सचिन पायलट यांनीही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. बिर्लांवर चार्जशीट दाखल केल्यामुळे देशी आणि परदेशी उद्योजकांचा विश्वास डळमळीत होईल. आणि कदाचित त्यामुळे नोकरशाही आणि धोरणकर्त्यांवरही नकारात्मक परिणाम होईल अशी भीती पायलट यांनी व्यक्त केली. काय म्हणाले सचिन पायलट? “कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, आणि गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे हे खरं असलं तरी अशी कृत्यं वास्तवावर आधारलेले असले पाहिजेत आणि त्यामुळे भीती आणि अस्थिरतेचं वातावरण निर्माण होता कामा नये. अलिकडच्या घडामोडींमुळे देशी आणि परदेशी उद्योजकांचा विश्वास डळमळीत होईल. आणि कदाचित त्यामुळे नोकरशाही आणि धोरणकर्त्यांवरही नकारात्मक परिणाम होईल."-सचिन पायलट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.