मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

फिल्म रिव्ह्यु : ज्यु.कॉलेजची टाइम'पास' लव्हस्टोरी !

फिल्म रिव्ह्यु : ज्यु.कॉलेजची टाइम'पास' लव्हस्टोरी !

अमोल परचुरे, समीक्षक

यशाची हॅटट्रीक साजरी केल्यावर रवी जाधवचा चौथा मराठी सिनेमा 'टाइमपास'...याआधी बालकपालक मध्ये विषय वेगळा होता आणि काळ होता 1985-86 चा...आता 'टाइमपास'मध्ये काळ आहे 1990-91 चा, म्हणजेच जेव्हा 'कयामत से कयामत तक'ची तरुणाईवर जादू होती तेव्हाचा. आता टाइमपास नावावरुन काही प्रेक्षकांना असं वाटू शकतं की, हा डेव्हिड धवन सारखा एखादा टाइमपास सिनेमा असेल. पण हा टाइमपास म्हणजे प्रेमाचाच एक प्रकार म्हणायला हवा. ज्युनिअर कॉलेजमध्ये होणारं प्रेम, जे कधी शारिरिक आकर्षणातून झालेलं असतं, कधी आपल्याला एकतरी गर्लफ्रेंड पाहिजेच या गरजेतून झालेलं असतं. कधी शायनिंग मारायला किंवा कधी सिनेमात बघून स्वप्नांच्या दुनियेत भटकण्यासाठी 'नैन से नैन' मिळालेले असतात. मग अभ्यासात लक्ष लागत नाही, स्वभाव बदलतो. जग बदलायला निघाल्याचा आविर्भाव असतो, पण बर्‍याचदा तो एक टाइमपास असतो आणि ते लक्षात यायला खूप उशीर लागला तर मग आयुष्याचाच 'टाइमपास' होऊ शकतो. पण रवी जाधवचा 'टाइमपास' म्हणजे केवळ एवढंच नाही. यातली 'टाइमपास' करणारी जोडी ही भिन्न वर्गातली आहे, त्यांच्यात जातीय आणि आर्थिक दरी आहे, अर्थात या दरीचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही, पण समाजासाठी ही वर्गवारी खूप महत्त्वाची असते.

काय आहे स्टोरी ?

time pass film review

ही दगडू परब (प्रथमेश परब) आणि प्राजक्ता लेले (केतकी माटेगावकर)ची टाइमपास लव्हस्टोरी आहे. ठाणे-डोंबिवली-कल्याण-पनवेल अगदी रायगडपर्यंत जे वातावरण 90च्या काळात होतं, त्याच वातावरणात फुलणारी ही लव्हस्टोरी आहे. प्राजक्ता राहतेय ती चाळ म्हणजे सुशिक्षित म्हणवणार्‍या उच्चवर्णीयांची आणि दगडू राहतोय गरीब कष्टकरी वस्तीमध्ये. अनेक वर्ष दगडू दहावीतच अडकलाय आणि प्राजक्ता आता कॉलेजमध्ये गेलेली. अशा दोन तरुण जीवांमध्ये प्रेमाचा अंकुर फुलायला लागतो, ते एकमेकांना चोरुन भेटायला लागतात. मुलीच्या बदललेल्या वागणुकीवर आई-वडिलांची नजर असते आणि तिकडे दगडू काहीच काम करत नाही म्हणून त्याच्या घरी ताण वाढत असतो. दुनियेची कसलीच फिकीर नसलेल्या या प्रेमी जीवांचं हे प्रेम कयामत पासून कयामत पर्यंत कसं जातं, त्याचा टाइमपास प्रवास सिनेमात दिसत राहतो. बालक-पालक सारखं टाइमपासमध्ये क्लायमॅक्सला कुणी संदेशपर भाषण देत नाही एवढंच आत्ता सांगू शकतो.

नवीन काय ?

23523552 time pass

सिनेमातला काळ आहे 1990-91 चा.. दोन-तीन रेफरन्स सोडले तर हा काळ उभा करण्यासाठी फार मेहनत घेतलेली दिसत नाही. सिनेमाचा वेग हा आणखी एक मायनस पॉईंट.. खरंतर, गाण्यांमधून किंवा मोन्टाजमधून कथा सरसर पुढे सरकणं हीच तर रवी जाधवच्या सिनेमांची खासियत आहे, पण टाइमपासमध्ये काही सीन्स लांबलेले आहेत. इथे दिग्दर्शकाच्या डोक्यात हळुवार मांडणी असावी, पण दगडू-प्राजक्ताचा लायब्ररीतला सीन किंवा दगडूचं स्वप्नरंजन अशी काही उदाहरणं आहेत जिथे ही मांडणी जरा जास्तच हळुवार झालीये. शिबानी दांडेकरचं हळदीमधलं आयटम साँग सुपरहिट झालंय हे खरं आहे, पण ते सिनेमाच्या टाइपमध्ये फिट्ट बसत नाही. कास्टिंगमध्येसुद्धा थोडा घोळ झालाय. मेघना एरंडेला वैभव मांगलेची बायको आणि केतकीची आई म्हणून पचवणं जरा कठीण जातं. तांत्रिकदृष्टया पाहिलं तर सिनेमॅटोग्राफर महेश लिमयेची उणीवसुद्धा सिनेमाभर जाणवत राहते. पण या अशा गोष्टी सोडल्या तर टाइमपास एकदा तरी पहावा असा नक्कीच आहे. चिनार-महेशची गाणी, त्यांचं टेकिंग, मुख्य कलाकारांचा अभिनय, चटपटीत संवाद, नॉस्टॅल्जिया अशा कारणांमुळे बर्‍यापैकी टाइमपास होऊन जातो. चाळीतल्या फलकावर बदलत जाणारे संदेश आणि सूचना अशा बारीक बारीक गोष्टींवरही मेहनत घेतलेली जाणवत राहते.

परफॉर्मन्स

235235time pass film review

अभिनयाबद्दल बोलायचं तर आधी भाऊ कदमचं नाव घ्यावं लागेल. भाऊची इमेज 'टाइमपास' कॉमेडी ऍक्टर अशीच झालेली आहे, पण टाइमपास सिनेमामध्ये सीन्स कमी असतांनाही त्याने सिरीअस रोलसुद्धा तेवढ्याच ताकदीने केलाय. वैभव मांगलेने BARC मध्ये ज्युनिअर लिपीक असलेल्या माधवराव लेलेचं अर्कचित्र चांगलं उभं केलंय. केतकी माटेगावकरने सुद्धा थोडं आपल्या सोज्ज्वळ इमेजमधून बाहेर पडून काही सीन्समध्ये धमाल केलीये. प्रथमेश परब या कलाकारासाठी हा अतिशय महत्त्वाचा सिनेमा म्हटला पाहिजे कारण तो सिनेमाचा हिरो आहे. दगडूचा टपोरी ऍटिट्यूड, प्राजक्ताच्या प्रेमात पागल होणं हे सगळं उत्तमप्रकारे साकारलंय, पण या दगडूमध्ये सतत बालक-पालकचा विशू दिसत राहतो. प्रेक्षकांसाठी ही चांगली गोष्ट असली तरी यानंतरच्या सिनेमांमध्ये त्याला तोचतोचपणा टाळावा लागेल.उर्मिला कानेटकर आणि भूषण प्रधान यांची कामंसुद्धा चांगली झाली आहेत. साईबाबांच्या देवळात गायली जाणारी फिल्मी भजनं हा सिनेमाचा हायलाईट ठरु शकतो. एकंदरित, प्रेक्षकांना कनेक्ट करण्यात थोडा कमी पडत असला तरी चांगला टाइमपास करणारा सिनेमा नक्कीच आहे.

रेटिंग - 60

First published:

Tags: Bollywood, Prathmesh Parab, Priyadarshan Jadhav, Ravi Jadhav, Talk Time ibnlokmat, TIME PASS, Time pass marathi movie, Time Pass Marathi Movie Promo, Time pass marathi movie song, Time pass marathi movie video, केतकी माटेगावकर, प्रथमेश परब, फिल्म रिव्ह्यु