02 डिसेंबर : नंदूरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसनं आपला बालेकिल्ला कायम राखत सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ चारत विजय मिळवला आहे. नंदूरबारमध्ये सत्तांतर झालंय तर धुळ्यामध्ये काँग्रेसनं एकहाती सत्ता मिळवली आहे.
नंदुरबारमध्ये काँग्रेसला 29 जागा, राष्ट्रवादीला 25 जागा तर भाजपला एकच जागा मिळालीय. राष्ट्रवादीचा या पराभवामुळे वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांना धक्का बसलाय. कारण विजयकुमार गावितांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने ही निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीला मागे सारत काँग्रेसची सरशी झालीये. गावितांचे बंधू प्रकाश गावित यांच्यासह मोठा गाजावाजा करून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या पी. के. अण्णा पाटलांच्या सुनेचाही या निवडणुकीत पराभव झालाय.
नंदुरबार हा काँग्रेसचा बालकिल्ला मानला जातोय. मात्र गेल्या काही वर्षांपासून गावित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे गावितांची प्रतिष्ठापणाला लागली होती. या निवडणुकीसाठी गावित महिनाभर तळ ठोकून होते. प्रचारासाठी राष्ट्रवादीचे सर्व मातब्बर नेत्यांनी हजेरी लावली होती. खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थिती पी. के. अण्णा पाटील यांनी जाहीर प्रवेश केला होता. मात्र तरीही राष्ट्रवादीला सात जागांवर पराभव मानावा लागाला आहे. मागच्या वेळी राष्ट्रवादीकडे 35 जागा होत्या यावेळी त्यांना 25 जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेसला यावेळी 13 जागा अधिक जागा मिळाल्या आहे. तर दुसरीकडे धुळे जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेसला एक हाती सत्ता मिळाली. धुळयाच्या 56 जागांपैकी काँग्रेसला 30 , भाजपाला 13, राष्ट्रवादी काँग्रेसला 7, शिवसेनेला 2, आणि 4 जागा अपक्षांना मिळाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Vijaykumar gavit, धुळे, नंदुरबार, राष्ट्रवादी