29 नोव्हेंबर : लैंगिक अत्याचार प्रकरणी तहलकाचा माजी संपादक तरूण तेजपालला अटक होण्याची शक्यता आहे. पण ज्या पीडित तरूणीवर हा प्रसंग घडला तीने आपल्या भावनांना आज वाट मोकळी करून दिली. तेजपाल यांचं कृत्य कायद्याच्या भाषेत बलात्काराच्या व्याख्येत बसतं असं या तरुणींचं म्हणणं आहे.
तसंच सर्व राजकीय पक्षांनी त्यांनी हे प्रकरण महिलांवरचे अत्याचार, सत्ता आणि हिंसा या मूळ मुद्द्यांपासून दूर नेऊ नये आणि त्याला राजकीय वळण देऊ नये असं आवाहनही या तरुणीनं केलं.
पीडित तरुणीचं निवेदन
“गेल्या 15 दिवसांत सर्व थरांतून मिळालेल्या पाठिंब्याने मला बरं वाटतंय. पण माझी तक्रार ही निवडणुकांच्या आधीचा राजकीय कट असल्याच्या चर्चांमुळे मला वाईट वाटलंय. मी तक्रार करण्यासाठी इतका वेळ का घेतला याविषयीही चर्चा सुरू आहे. अनेकांनी लैंगिक अत्याचार आणि बलात्कार या दोन शब्दांवरून प्रश्नही उपस्थित केलेत. पण या सगळ्या प्रकरणातील सर्वात कठीण गोष्ट म्हणजे या प्रक्रियेतून जाताना मला झालेला त्रास.
तेजपाल यांचं कृत्य कायद्याच्या भाषेत बलात्काराच्या व्याख्येत बसतं. मी सर्व राजकीय पक्षांना आवाहन करते की, त्यांनी हे प्रकरण महिलांवरचे अत्याचार, सत्ता आणि हिंसा या मूळ मुद्द्यांपासून दूर नेऊ नये आणि त्याला राजकीय वळण देऊ नये. मी तेजपाल यांच्यासारखी संपन्न नाही. मला माझ्या आईनं एकटीनं वाढवलंय. पहिल्यांदा आम्ही काय सांगतोय त्याच्यावर शंका घेतली गेली, त्यानंतर आमच्या हेतूवर शंका घेतली गेली आणि त्यानंतर आमच्या सामर्थ्याचा आमच्याविरोधातच वापर केला गेला. लैंगिक अत्याचारांविरुद्ध आम्ही आवाज उठवला तर आमच्या नोकर्या, करिअर धोक्यात येऊ शकतं असंही काही राजकीय नेते म्हणतात.” -पीडित तरूणी