07 जुलै : ढाका दहशतवादी हल्ल्यातील बांगलादेशी दहशतवाद्याने इस्लामिक उपदेशक डॉ. झाकीर नाईक यांना प्रेरणास्थान मानल्यामुळे संशयाच्या भोवर्यात सापडलेल्या डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणाची चौकशी करावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशामुळे डॉ. नाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या मुंबईतील डोंगरी इथल्या कार्यालयाबाहेर आज सकाळपासून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस दलातील एका अधिकार्याने दिली होती. त्यानंतर काही तासांनी मुख्यमंत्र्यांनी नाईक यांच्या भाषणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
बांगलादेशातील ढाका इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्याने आपण नाईक यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचे जाहीर केल्यानंतर आयबीनं नाईक यांच्याविरोधात मोहिम उघडली. या प्रकरणावर केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनीही दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. नाईक यांच्या भाषणांबाबत चिंता व्यक्त केली होती. ’ झाकीर नाईक यांचे भाषण आमच्यासाठी एक चिंतेचा विषय आहे. आमच्या यंत्रणा यावर काम करत आहेत. परंतु आम्ही काय पावलं उचलतो आहोत याबाबत मी सांगू शकणार नाही.’ अशी प्रतिक्रिया रिजिजू यांनी व्यक्त केली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांच्या भाषणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर या प्रकरणाचे गांभिर्य अधिक वाढले आहे. या चौकशीतून काय निष्पन्न होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv