05 एप्रिल : राज ठाकरे काय बोलले यावर खालच्या पातळीवर जाऊन उत्तर देणार नाही. मी काही उकडलेली बटाटेवडे पाहिले नाही त्यामुळे हा विषय संपला आहे अशी रोखठोक भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. उद्धव ठाकरे यांनी आयबीएन-लोकमतला सर्वात पहिली मुलाखत दिली यावेळी ते बोलत होते. उद्धव यांनी सर्वच मुद्यांवर आपली भूमिका मांडत गडकरी,राज ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला.
उद्धव म्हणतात, आता राज ठाकरे मोदींचा प्रचार करत आहे. त्यांच्याकडे चेहरा नाही. आमचे अधिकृत उमेदवार असताना मोदींना पाठिंबा देण्याची गरज काय ? आम्ही जेवतोय ना तुमची घास भरवायची काय गरज ? असा शेलक्या शब्दात टोला उद्धव यांनी राज ठाकरेंना लगावला. मोदींचे गुणागाण आम्ही आताच गात नाहीय. मुळात आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत. पण कुणाचं उगाच ‘मोदी के नाम पे’ असं सुरू आहे असा टोलाही उद्धव यांनी राज यांना लगावला. तसंच महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा गडकरींचा प्रयत्न फसला आहे. त्यांनी प्रयत्न केला आहे पण राजनाथ सिंग, नरेंद्र मोदी, गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस यांनी सर्व काही स्पष्ट केलंय त्यामुळे गडकरींचा प्रयत्न फसलाय असंही उद्धव म्हणाले.