16 ऑक्टोबर : कोळसा खाण वाटप करताना सर्व निर्णय पंतप्रधान डॉ. मनमनोहन सिंग यांच्या संमतीने झाले होते, त्यामुळे आपण एखाद्या कटात सहभागी असलो तरी पंतप्रधानही त्यामध्ये सहभागी असतील. मग फक्त माझ्याविरोधात आणि कुमारमंगलम बिर्ला यांच्याविरोधातच एफआयआर का दाखल करण्यात आला असा प्रश्न कोळसा खात्याचे माजी सचिव पी सी पारीख यांनी विचारलाय. कोळसा घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने मंगळवारी पी.सी.पारीख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. त्यावर पारीख यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. पारख यांच्या या वक्तव्यानंतर वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. पंतप्रधानांना वाचवण्यासाठीच सीबीआयने पारख यांना बळीचा बकरा करायचं ठरवलंय अशी टीका भाजपने केलीय. भाजप नेते यशवंत सिन्हा आणि माकप नेते गुरूदास दासगुप्ता यांनी पंतप्रधानांवर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केलीय. दरम्यान, कुमारमंगलम बिर्ला यांच्यावर दाखल झालेल्या एफआयआरचेही तीव्र पडसाद उमटलेत. देशाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे. आणि अशावेळी देशातल्या नावाजलेल्या उद्योगपतींची प्रतिमा मलीन होईल अशा घटना घडत आहेत. याचे गंभीर परीणाम गुंतवणुकीच्या दृष्टीने देशात होतील अशी भीती उद्योगजगताने व्यक्त केलीय. या सगळ्यात पंतप्रधानांची आणि सरकारची बाजू लढवण्याचा कुचकामी प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.