21 ऑक्टोबर : कोळसा घोटाळ्याप्रकरणी सीबीआय उद्या मंगळवारी सुप्रीम कोर्टात स्टेटस रिपोर्ट सादर करणार आहे. या रिपोर्टमध्ये काय म्हटलंय, याची एक्सक्लुझिव्ह माहिती सीएनएन आयबीएनच्या हाती लागलीय. उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी. सी. पारख यांच्या विरोधात सीबीआयने जो एफआयआर दाखल केलाय, यावर सीबीआय ठाम आहे. बिर्लांविरोधात तपास सुरूच राहणार असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. पण, या घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधानांची चौकशी होणार का, याबाबत सीबीआयच्या स्टेटस रिपोर्टमध्ये काहीच उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, बिर्लांविरोधातल्या तपासापासून मागे हटणार नाही, अशी सीबीआयची भुमिका असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. दरम्यान, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंह अहलुवालिया हे उद्योजकांच्या पाठिशी उभे राहिलेत. हिंदाल्को कंपनीला जो कोळसा ब्लॉक देण्यात आला त्यात अनियमितता झाल्याचे काहीच पुरावे नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. सीएनएन आयबीएनला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.