अजय कौटिकवार, मुंबई 20 जानेवारी : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकिर्दीचा आजचा शेवटचा दिवस आहे. 8 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर ते आज डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवतील. अमेरिकेच्या आजवरच्या अत्यंत यशस्वी अध्यक्षांमध्ये त्यांचा समावेश केला जाणार आहे. ओबामांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा खास आढवा.
8 वर्षांपूर्वी अमेरिकेत इतिहास घडला. दोनशे वर्षांपासून लाखो लोकांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. आफ्रिकन वंशाचे कृष्णवर्णीय बराक ओबामा अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आणि नव्या पर्वाला सुरवात झाली. ही सुरवात होती एका नव्या अमेरिकेची. ओबामा जेव्हा अध्यक्षपदावर आले त्यावेळी मंदीमुळं अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं होतं. बँका कर्जात बुडत होत्या. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी अर्थव्यवस्थेत तब्बल 800 बिलीयन डॉलर ओतले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं.
अर्थव्यवस्था सावरत असतानाच अमेरिकेतला वांशिकव्देष पुन्हा उफाळून आला. कृष्णवर्णियांवरच्या हल्ल्यात वाढ झाली. अनेक शहरांमध्ये दंगली उसळल्या. आपल्यातलाच एक अध्यक्षपदावर गेल्यानं मोठी आस लावून बसलेल्या ‘नाही रे’ वर्गाला हा धक्का होता. पक्षपात करण्याचे ओबामांवर आरोप झाले. ओबामा हे जन्मानं अमेरिकन नाहीतच, असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला. शेवटी व्हाईट हाऊसला अध्यक्षांच्या जन्माचं प्रमाणपत्र जाहीर करावं लागलं. अशा कठीण स्थितीत त्यांनी अमेरिकन समाजाची एकी कायम ठेवण्यात यश मिळवलं.
ओसामा बीन लादेनचा खात्मा ही त्यांच्या कार्यकाळातली सर्वात जमेची बाजू. इराकमधून सैन्य माघारी घेण्याची घोषणाही धाडसी ठरली. ओबामांच्या या उदार धोरणांमुळं युध्दखोर आणि ‘जगाचा पोलीस’ अशी अमेरिकेची प्रतिमा बदलण्यात त्यांना यश आलं.
ओबामांचे महत्त्वाचे निर्णय - अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात तीन महिला न्यायाशीधांची नियुक्ती - इराणविरुद्ध वैर विसरून ऐतिहासिक अणुकरार - पाच दशकांचं शत्रुत्व विसरून क्युबाशी पुन्हा संबंध - हिरोशिमात जाऊन अमेरिकेच्या अणुहल्ल्यात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली
लाखो अमेरिकन नागरिकांना आरोग्य सेवेच्या कक्षेत आणणाऱ्या ‘ओबामा केअर योजने’ला प्रचंड विरोध झाला. हा सर्व विरोध झेलत त्यांनी ही योजना अंमलात आणली. गन लॉबीला वेसण घालण्याची त्यांची इच्छा मात्र पूर्ण झाली नाही. गन कल्चर हा सुसंस्कृत अमेरिकेतला असंस्कृतपणा आहे ही खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली.
काय करायचं राहून गेलं? - गन लॉबीला वेसण घालण्यात यश नाही - ग्वांटेनामो जेल बंद करण्याच्या घोषणेची अंमलबजावणी नाही - मुक्त आणि सर्वसमावेशक अशी अमेरिकेची प्रतिमा कायम राखण्यास अपयश
ओबामा हे अमेरिकेच्या उदार संस्कृतीचं प्रतिक होते. हा उरपणा कायम त्यांच्या धोरणांमध्ये आणि वागण्यात होता. अमेरिका अध्यक्ष बराक ओबामांना कधीच विसरणार नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv