20 सप्टेंबर : माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंग हे आता आणखी एका वादात सापडले आहेत. सिंग यांनी जम्मू-काश्मीर सरकार उलथवून टाकण्यासाठी आर्मीत एक स्पेशल युनिट स्थापन केलं होतं असा खळबळजनक दावा ‘इंडियन एक्स्प्रेस’ने केलाय. एक्स्प्रेसच्या बातमीनुसार लष्कराच्या बोर्ड ऑफ आफिसर्सच्या चौकशीत ही बाब समोर आलीयं. आणि या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी अशी शिफारस या चौकशी समितीने केल्याचा दावा या बातमीत करण्यात आलाय. या व्यतिरिक्त व्ही.के सिंग यांनी लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेचा एक भाग असलेल्या टेक्निकल सर्व्हिसेस डिव्हिजनच्या मार्फत सध्याचे लष्करप्रमुख बिक्रम सिंग यांच्या बढतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला असा दावाही या बातमीत करण्यात आलाय. बोर्ड ऑफ ऑफिसर्सच्या अहवालाची गंभीर दखल संरक्षण मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयानं घेतली असल्याचंही या बातमीत म्हटलंय. पण व्ही. के. सिंग यांनी आपण गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत एका कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळेच आपल्याला टार्गेट करत असल्याचं पीटीआयशी बोलताना म्हटलंय. काय आहेत प्रमुख आरोप?
- - गुप्त कामांसाठी असलेल्या निधीचा गैरवापर करून ओमर अब्दुलांचं सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न करणे
- - NGO चा वापर करून सध्याचे लष्करप्रमुख बिक्रम सिंग यांच्या बढतीत अडथळे आणणे
- - कोणत्याही कारणाशिवाय इंटरसेपश्न मशीन नष्ट करणे
संरक्षण मंत्रालयाचं स्पष्टीकरण
- - सरकारला आर्मी हेडक्वार्टरकडून याप्रकरणी अहवाल मिळालाय
- - हा रिपोर्ट राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यात हस्तक्षेप करणारा आहे
- - याप्रकरणी सरकार योग्य तो निर्णय घेईल
- - अहवालाचा सखोल अभ्यास केल्यानंतर पुढचं पाऊल उचलण्यात येईल