05 सप्टेंबर: अजित पवार तो फटकळ असेल. बोलताना एखादा शब्द इकडं तिकडं होत असेल पण त्यांची काम करण्याची हातोटी-वृत्ती यामुळं मला तो आवडतो. भविष्यात अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी अजित पवारांचं कौतुक केलं. तसंच अजित पवार कसा आहे, काय बोलतोय याबद्दल मला काही घेणं देणं नाही. मला उमेदवारीला उभं राहायचं आहे अजित मला मदत करेल असं काही नाही त्याचा स्वभाव मला आवडतो असंही ते म्हणाले.
तसंच नानांनी सुनील तटकरेंवरतीही स्तुतीसुमनं उधळली. निमित्त होतं पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळानं जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यावर लिहलेल्या कोकणरत्न या पुस्तकाच्या प्रकाशनाचं. नाना पाटेकरांनी कधी राजकारण्यांची स्तुती करत कधी त्यांची टर उडवत आपल्या खास शैलीत किस्से सांगत प्रेक्षकांना हसवलही आणि टाळ्याही मिळवल्या.
शिक्षक दिनानिमित्त पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात नानाची फटकेबाजी ऐकायला मिळाली. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना नाना पाटेकर यांनी नरेंद्र दाभोळकर यांची हत्या ही दु:ख देणारी घटना आहे. मारेकरी सापडले तरी दाभोळकर परत येणार नाहीत. अजून 20-25 वर्ष दाभोळकर जगायलं हवे होते या शब्दात भावना व्यक्त करत पोलीस दाभोळकरांचे मारेकरी नक्की शोधून काढतील असा विश्वासही नानानं व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.