नवी दिल्ली, 19 जुलै : पाळीव प्राण्यांमध्ये श्वान हा सर्वांत लोकप्रिय प्राणी आहे. असं म्हणतात, श्वान हा अतिशय प्रामाणिक प्राणी आहे. तो आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत मालकाशी एकनिष्ठ राहतो. मालक संकटात असेल तर त्याची मदत करण्याचा प्रयत्न श्वान करतो. पुदुच्चेरीतील एका घटनेत याची प्रचिती आली. तिथे एका तरुणीनं आत्महत्या केली. तिच्या श्वानामुळे या घटनेची माहिती इतरांना मिळाली. श्वान नसता तर तिचा शोध घेण्यात कित्येक दिवस गेले असते. ‘नवभारत टाइम्स’नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडंगी कांचना (वय 22 वर्षे) असं या तरुणीचं नाव असून, ती आंध्र प्रदेशातील डॉ.आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील यानाम येथील रहिवासी आहे. तिनं जवळच्या बालयोगी पुलावरून गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली. तिच्या पाठोपाठ तिचा पाळीव श्वानही तिथे पोहोचला होता आणि पाण्याकडे बघून भुंकायला लागला. अस्वस्थ होऊन इकडे तिकडे धावू लागला. बर्याच वेळानंतर आपली मालकिण परत येणार नाही असं, वाटल्यावर तो खिन्न होऊन तिथेच बसला.
रात्रभर चप्पल जवळ बसला हा पाळीव श्वान पुलावर असलेल्या आपल्या मालकिणीच्या चप्पलजवळ बसला. संपूर्ण रात्रभर तो तिथेच बसून होता. हे बघून स्थानिक लोकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तरुणीचा शोध सुरू केला मात्र तिचा मृतदेह सापडला नाही. श्वानाला तिथून हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो अजिबात हलला नाही. विशेष म्हणजे त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. तो सतत रडत होता. यानाम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या तरुणीची आई हॉटेल चालवते. तिनं आत्महत्या का केली, याचा तपास सुरू आहे. यानाम हा पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेशाचा एक भाग आहे. मंडंगी कांचनाच्या या श्वानाला बघून अनेकांना ‘हाचिको’ जपानी श्वानाची आठवण झाली. हाचिको आपल्या मालकाच्या मृत्यूनंतर जवळपास नऊ वर्षे त्याची वाट बघत होता. ज्या क्षणी आपण श्वानासारख्या पाळीव प्राण्यांना घरी आणतो, तेव्हापासून ते आपल्या कुटुंबातील एक सदस्य होतात. कालांतराने आपण त्यांच्याशिवाय राहण्याची कल्पनाही करू शकत नाही. अगदी त्यांना अंथरुणावर झोपू देण्यापासून ते खोडकरपणाबद्दल त्यांना फटकारण्या इतपत आपल्याला त्यांचा लळा लागलेला असतो. या प्राण्यांनादेखील आपल्या मालकाचा तितकाच लळा लागलेला असतो.