गुलशन कश्यप, प्रतिनिधी जमुई, 26 जुलै : उत्तरप्रदेश राज्यातील एसडीएम ज्योती मौर्या आणि आलोक मौर्या यांच्यातील प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणाची देशात खूप चर्चा होत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांनी आपल्या पतींचे शिक्षण बंद केल्याच्याही चर्चा आहेत. मात्र, याउलट एक घटना समोर आली आहे. यामध्ये पत्नीने आपल्या पतीच्या शिक्षणासाठी तिचे दागिने विकले. बिहार राज्यातील जमुई येथून ही घटना समोर आली आहे. आज या महिलेचा पती एका सरकारी शाळेत शिक्षक असून ते विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या नवनवीन पद्धतींमुळे सतत चर्चेत असतात. जितेंद्र शार्दुल असे या शिक्षकाचे नाव आहे. ते जमुई जिल्ह्यातील कल्याणपूरच्या सुधारित माध्यमिक शाळेत कार्यरत आहेत. त्यांची कहाणी संघर्षांनी भरलेली आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संजना यांनीही आपल्या पतीला खंबीर साथ दिली.
शिक्षक जितेंद्र विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतात. ते कधी त्यांच्यासोबत गातात, नाचतात तर कधी धमाल-मस्ती करून वर्गातील वातावरण आनंदी ठेवतात. त्यांच्या या शैलीमुळे त्यांचे कौतुकही होते. तसेच मुलांबरोबरच पालकही आनंदी राहतात. जितेंद्र शार्दुल यांनी बालपणापासूनच संघर्ष केला. त्यांनी सांगितले की, लग्नानंतर त्यांची आई जेव्हा माहेरी आली, तेव्हा अगदी सहाव्या दिवसापासून तिने मजूरी करायला सुरुवात केली होती. एका महिला जिचे नुकतेच लग्न झाले आहे, हातावरची मेहंदीही अजून उतरली नाही, त्या महिलेला मजूरी करावी लागली. तर विचार करा, त्यावेळी माझ्या घरची परिस्थिती कशी असेल? असे ते म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले की, एक वेळा माझी आई जेवणासाठी पीठ घेऊन येत होती. मात्र, ते पीठ गटारीजवळ पडले. मात्र, दुर्दैवाने त्यावेळी घरची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट होती की, आम्हाला ते पीठ उचलून त्यापासून पोळी बनवून खावे लागले होते. जेव्हा मी मॅट्रिकमध्ये शिकत होतो, तेव्हा एका दुर्घटनेत माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर आमची स्थिती फारच खराब झाली. मी कोळसा मजूर म्हणूनही काम केले. त्यामुळे माझे शिक्षणही अपूर्ण राहिले. याच कठीण काळात माझे लग्न झाले. मात्र, माझ्या पत्नीने खंबीरपणे माझी साथ दिली. तिने माझ्यात लपलेल्या टॅलेंटला ओळखले आणि माझ्या शिक्षणासाठी चक्क आपले दागिने विकले. माझे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून ती अनेकदा अन्नाविना राहिली. घरात अन्न कमी असायचे तेव्हा ती मला ते अन्न द्यायची आणि स्वत: मीठ पाणी पिऊन झोपी जायची. तर दुसरीकडे जितेंद्र शार्दुल यांच्या पत्नी संजना यांनी सांगितले की, अत्यंत कठीण परिस्थितीतून त्यांचे पती इथपर्यंत पोहोचले आहेत. मात्र, जितेंद्रमध्ये एक गोष्ट नक्की आहे की, ते जे काही विचार करतात, ती गोष्ट ते पूर्ण करतात. त्यांना लहान मुले खूप आवडतात. या कारणामुळेच त्यांना शिक्षण क्षेत्रात काम करायचे होते. त्यांचा पत्नीने दिलेली ही खंबीर साथ निश्चितच कौतुकास्पद आहे.