कोलकाता, 2 मे: एके काळी ममता बॅनर्जी यांच्या खास विश्सासातले समजले जाणारे, तृणमूलच्या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारे नेते शुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari latest news) यांनी गेल्या डिसेंबरमध्ये ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee Trailing) मोठा हादरा दिला. 11 आमदारांसह त्यांनी भाजपची वाट धरली तेव्हाच या निवडणुकीत (West Bengal Assembly Election 2021) अधिकारी यांची चर्चा सुरू झाली. नंदिग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांनी स्वतः उभं राहून शुवेंदू अधिकारी यांना थेट आव्हान दिलं. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे साऱ्या देशाचं लक्ष आहे. सकाळी 10.30 वाजेर्पंयतच्या मतमोजणीच्या कलानुसार बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस बहुमताच्या जवळ पोहोचण्याचा अंदाज असला, तरी नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जींना शुवेंदू अधिकारी यांनी तगडी लढत दिल्याचं स्पष्ट आहे. पहिले तीन तास या मतदारसंघाच्या मतमोजणीत शुवेंदू अधिकारी आघाडीवर होते. ममता बॅनर्जींना पिछाडीवर टाकणारा नेता म्हणून या नावाची चर्चा आहे.
LIVE Assembly Election Results 2021
एकेकाळी अधिकारी हे ममतांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी मंत्रिपदाचा आणि तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचा हात धरला. नंदिग्राममध्ये प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच ममता बॅनर्जींना अपघात झाला. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. आपल्यावर हल्ला झाला, अपघात घडवून आणला असे त्यांनी विरोधकांवर आरोप केले. शुवेंदू अधिकारी पुन्हा चर्चेत आले. वडील होते TMC चे संस्थापक सदस्य शुवेंदू यांचे वडील शिशिर अधिकारी हे तृणमूल काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते. खासदारही होते. त्यांच्या सुवेंदू आणि सौमेंदू या दोन मुलांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांचा तिसरा मुलगा दिव्येंदू अधिकारी हा तृणमूल काँग्रेसचा खासदार आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिशिर अधिकारी यांनीही मोदींच्या सभेला उपस्थिती लावून शुवेंदूंना साथ दिल्याचं उघड झालं.