नवी दिल्ली, 11 जून : हरियाणा राज्यसभा निवडणूक
(Haryana Rajya Sabha elections)खूपच रंजक ठरली. हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसला हा धक्का अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा
(Kartikeya Sharma) यांनी दिला आहे. ज्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांच्या कथित विजयाचे रूपांतर पराभवात केले. शुक्रवारी हरियाणात मतदान आणि नंतर मतमोजणी याबाबत जोरदार राजकीय नाट्य रंगले आणि अखेर रात्री दोन वाजता अजय माकन
(Ajay Maken) यांचा पराभव झाल्याचे जाहीर करण्यात आले. आठ वर्षांपूर्वी कार्तिकेय शर्मा यांच्या वडिलांना काँग्रेसने पक्षातून हाकललं होतं. एकप्रकारे त्यांनी आपल्या वडिल्यांच्या अपमानाचाच बदल घेतला असल्याचे बोलले जात आहे.
कार्तिकेय शर्मांच्या विजयातील आश्चर्याची बाब म्हणजे ते राजकारणातील नवे खेळाडू असून राज्यसभा निवडणुकीपासून राजकारणाच्या क्षेत्रात उतरले आहेत. आपल्या पहिल्या डावातच त्यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. चला जाणून घेऊया कोण आहेत कार्तिकेय शर्मा आणि त्यांचा राजकारणात येईपर्यंतचा राजकीय प्रवास….
जेसिका लाल खून खटल्यात दोषी ठरलेल्या मनू शर्माचा 41 वर्षीय भाऊ आणि काँग्रेसचे बहिष्कृत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री विनोद शर्मा यांचा मुलगा कार्तिकेय शर्मा यांना हरियाणा राज्यसभा निवडणुकीत सत्ताधारी आघाडीतील भागीदार भाजप आणि जेजेपीचा पाठिंबा होता.
2007 ITV नेटवर्कची स्थापना
कार्तिकेय शर्मा यांनी बी.एससी (ऑनर्स) मधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. कार्तिकेय शर्मा यांनी 2007 मध्ये ITV नेटवर्कची स्थापना केली जी विविध इंग्रजी आणि हिंदी वृत्तवाहिन्या आणि स्थानिक दैनिके चालवते. ITV नेटवर्कचे राष्ट्रीय चॅनेल NewsX, आणि प्रादेशिक चॅनेल जसे की इंडिया न्यूज हरियाणा, इंडिया न्यूज मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, इंडिया न्यूज पंजाब आणि इंडिया न्यूज उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड, हिंदी भाषिक प्रदेशांवर वर्चस्व गाजवतात.
Haryana Rajya Sabha Election Result: एका मतानं उलटला गेम, हरियाणातही महाराष्ट्रासारखाच ड्रामा; कसे हरले Congress चे माकन
करोडो रुपयांच्या मालमत्तेचा मालक
कार्तिकेय शर्मा हे खूप चांगले बिझनेसमन आहेत. दिल्ली, गुरुग्राम, चंदीगड आणि पंजाबमधील अनेक उत्तम स्टार हॉटेल्समध्ये त्यांची हिस्सेदारी आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे सुमारे 390 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये Piccadilly Hotels Pvt Ltd मधील Rs 14.60 कोटी, सून-एन-श्योर होल्डिंग्स लिमिटेड मधील Rs 35.04 लाख आणि मार्क बिल्डटेक प्रायवेट लिमिटेड मधील Rs 367.65 कोटी किमतीच्या शेअर्सचा समावेश आहे. याशिवाय दक्षिण दिल्लीतील समलखा येथे त्यांच्याकडे 2.52 एकर शेतजमीन आहे.
काँग्रेसच्या बंडखोर आमदाराचे मानले आभार
राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कार्तिकेय शर्मा यांनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि भाजप-जेजेपी नेत्यांचे समर्थन केल्याबद्दल आभार मानले आणि कृतज्ञता व्यक्त केली. यासोबतच त्यांनी काँग्रेसचे बंडखोर कुलदीप बिश्नोई यांचेही आभार मानले, ज्यांच्या मतामुळे त्यांचा विजय निश्चित झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.