कोलकाता, 4 जून : पश्चिम बंगालच्या राजकारणात आता पुन्हा भाजपला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) दाखल झालेले काही आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये परत येण्याची वाट पाहत असल्याचे सांगण्यात येत आहे. या आमदारांची संख्या थोडी-थोडकी नसून 33 असल्याचे सांगितले जात आहे. तृणमूल काँग्रेसचे (TMC) माजी नेते सरला मुर्मू, सोनाली गुहा आणि दीपेंदु विश्वास यांनी आधीच पक्षात जाण्याची तयारी दर्शविली आहे.
भाजप राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या मुलाचे टीएमसीमध्ये जाण्याचे संकेत
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांचा मुलगा शुभ्रांशु रॉय हे तृणमूल काँग्रेसमध्ये जातील असे, स्थानिक वृत्तपत्रांनी अंदाज वर्तवला आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. खरंतर त्यांनी केलेल्या एका फेसबुक पोस्टनंतर अशा चर्चांना उधाण आले आहे. सरकारवर टीका करण्यापेक्षा स्वतःचं निरीक्षण करणेच चांगले आहे, अशा आशयाची एक फेसबुक पोस्ट त्यांनी लिहिली होती. त्यावरून आता तर्क-वितर्क लावले जात आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये बीजपूर मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या शुभ्रांशु रॉय यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावं लागलं होतं.
भाजपकडून वृत्ताचे खंडन, TMC ला पण घाई नाही
भाजपचे प्रवक्ते शमिक भट्टाचार्य यांनी भाजप नेत्यांच्या टीएमसीमधील प्रवेशांच्या वृत्तांचे खंडन केलं आहे. पक्षप्रवेशाच्या येणाऱ्या या बातम्या अफवा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भाजप नेते पक्ष सोडतील हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे याबाबतच तृणमूल काँग्रेसला कोणताही घाई गडबडीत निर्णय घेण्याची गरज नसल्याचे सांगितले जात आहे. TMC खासदार शुभेंदू शेखर रॉय यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा होऊ शकते. टीएमसीमध्ये परत दाखल होऊ इच्छिणाऱ्या नेत्यांना अगोदर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील, असे त्यांनी सांगितले.
असे नेते पक्षातून का बाहेर गेले होते, याची चौकशी केली जाईल. त्यांच्या परतीचा हेतू काय आहे? आणि इतर काही प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतरच त्यांच्या पुन्हा सदस्यत्वाबाबत निर्णय घेता येईल. पक्षात येवू इच्छिणाऱ्या अनेक नेत्यांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत असा दावाही रॉय यांनी केला आहे. अशा पद्धतीनं जर नेते आमच्याकडे येण्यासाठी तयार होऊ लागले तर बंगालमधून भाजपचा सुपडा साफ होईल असे ते म्हणाले.
हे वाचा - राजीव सातव यांच्या जागेवर आता कोण? राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यात नावावरून मतभेद
मे महिन्यात झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसीने राज्यात पुन्हा सत्ता मिळविली. बंगालमध्ये एकूण 294 विधानसभा सदस्य संख्या आहे. यावेळी टीएमसीने 213 आणि भाजपने 77 जागा मिळवल्या आहेत. निवडणुका होण्यापूर्वी राज्यात टीएमसीचे बरेच नेते भाजपमध्ये दाखल झाले होते. यामध्ये नंदिग्राममध्ये सीएम बॅनर्जी यांना पराभूत करणारे दिग्गज नेते आणि शुभेंदू अधिकारी यांचे नाव आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm west bengal, TMC, West bengal