कोलकाता, 9 एप्रिल: पश्चिम बंगालमध्ये
(West Bengal) भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये
(TMC) विधानसभा निवडणुकीतील संघर्ष शिगेला पोहचाला आहे. दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात जोरदार आरोप करत आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
(Mamta Banerjee) यांनी एका सभेत भाजपा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
(Amit Shah) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
बंगालमधील एका निवडणूक सभेत ममतांनी अमित शहांवर आरोप केला की, "तुम्ही मला जखमी केलं. मी मेलेलं तुम्हाला पाहयचं आहे. पण मी मृत्यूला घाबरत नाही." यापूर्वी ममता यांनी एक राजकीय पक्ष मला मारण्याचा कट रचत आहे, असा आरोप केला होता. अर्थात यावेळी त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं.
ममतांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आरोप केला होता की, "एक राजकीय पक्ष मला मारण्याचा कट करत आहे, हे मला माहिती आहे. त्यांनी हा हेतू पूर्ण करण्यासाठी सुपारी देखील दिली आहे. भाडोत्री मारेकरी निश्चित करण्यात आले आहेत. माझ्या घराची टेहाळणी केली जात आहे."
2016 साली देखील केला होता आरोप
यापूर्वी 2016 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील ममता यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला होता. 'डावे पक्ष, भाजपा आणि काँग्रेस हे निवडणुकीत एकत्र आले आहेत. ते मला मारण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप ममता यांनी केला होता.
(वाचा : मुस्लीमांसंदर्भातील वक्तव्य करणं भोवलं; ममता बॅनर्जींविरोधात ECची नोटीस )
ममतांना पराभवाची भीती
ममता बॅनर्जी पराभवामुळे बिथरल्या आहेत. त्यांच्या राज्यात महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. पहिल्या तीन टप्प्यात भाजपा 63 ते 68 जागा जिंकणार असल्याचा दावा भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. अमित शहा यांनी कोलकातामध्ये पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी हा आरोप केला.
"भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गेल्या काही दिवसांमध्ये सतत हल्ले झाले. आमचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर देखील हल्ला झाला. या विरोधात टीएमसी नेत्यांनी काहीही वक्तव्य केलं नाही. त्यांचं मौन हे हिंसाचार करण्यास पाठिंबा देत आहे,'' अशी टीका अमित शहा यांनी यावेळी केली. बंगालमध्ये चौथ्या टप्प्यात शनिवारी मतदान होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.