
उत्तराखंडमध्ये सातत्याने होणाऱ्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. उत्तराखंडमधील फोटो कुणाच्याही काळजाचा थरकाप उडवतील, असेच आहेत. डोंगरावरून रस्त्यावर भलेमोठे दगड कोसळत असून त्यामुळे वाहतुकीवर विपरित परिणाम झाला आहे.

ऋषिकेश-बद्रीनाथ हायवेवर सिरोबगडजवळ झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठमोठे दगड रस्त्यावर आले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. अनेक तास या हायवेवर ट्रॅफिक जॅम झालं होतं.

या हायवेवरील वाहनांना अख्खी रात्र रस्त्यावरच काढावी लागली. सकाळपर्यंत छोट्या मोठ्या भूस्खलनाच्या घटना घडत होत्या. सकाळी जेव्हा भूस्खलन थांबलं, तेव्हा वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर वाहतूक सुरू झाली.

रुद्रप्रयाग जिल्ह्यातही तशीच स्थिती होती. रस्त्यावर दगड आल्यामुळे अनेक तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.




