मुंबई, 23 ऑगस्ट : सावरकर वीर (Veer Savarkar) नव्हते का? त्यांच्यावर इंग्रजांची कृपा होती का? वीर सावरकर आणि टिपू सुलतान यांची तुलना होऊ शकते का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात वारंवार येत असतील. टिपू सुलतान आणि सावरकर यांच्या पोस्टरवरून कर्नाटकात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. टिपू आणि सावरकरांचे बॅनर हटवण्यावरून येथील काही भागात दोन गटात हाणामारी झाली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान सावरकर विरुद्ध टिपू सुलतान वाद का निर्माण झाला? अखेर त्यामागे काय कारण आहे? हा वाद आता कर्नाटकावरुन तेलंगणातील हैदाराबादमध्ये पोहचला आहे. हैदराबादमधील भाजप आमदार टी राजा सिंग आणि AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यामध्ये जुंपली आहे. काय आहे प्रकरण? कर्नाटकात 15 ऑगस्ट रोजी शिवमोग्गा येथे वीर सावरकर आणि टिपू सुलतान यांची पोस्टर रॅली काढण्यात आली होती. यादरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी झाली, ज्यामध्ये जबिउल्ला नावाच्या व्यक्तीने पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला केला. 4 जणांना अटक करण्यात आली असून परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर आता राजकीय पक्षांनीही या वादात उडी घेतली आहे. हिंदुत्ववादी संघटनांची टिपू सुलतानवर टीका का? टिपू धर्मनिरपेक्ष नव्हता, तर असहिष्णू आणि निरंकुश शासक होता, असा हिंदू संघटनांचा दावा आहे. 2015 मध्ये, RSS मुखपत्र पाचजन्यमध्ये टिपू सुलतानच्या जयंतीला विरोध करणारा एक लेख देखील प्रकाशित झाला होता, ज्यामध्ये टिपूला दक्षिणेचा औरंगजेब म्हणून वर्णन करण्यात आले होते. भाजपचे राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये म्हटले होते की, ‘टिपू सुलतानने हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी आपल्या राजवटीचा वापर केला आणि तेच त्याचे ध्येय होते. त्याच बरोबर त्यांनी हिंदू मंदिरांची तोडफोड केली, हिंदू महिलांच्या सन्मानावर हल्ले केले आणि ख्रिश्चन चर्चवर हल्ले केले. यामुळे आमचा विश्वास आहे की राज्य सरकारे टिपू सुलतानवर चर्चासत्रे आयोजित करू शकतात आणि त्याच्या चांगल्या-वाईट कृतींवर चर्चा करू शकतात. मात्र, त्याच्या जयंतीनिमित्त उत्सव आयोजित केल्याने तरुणांमध्ये चुकीचा संदेश जातो. पवार पॅटर्न दिल्लीत? ज्याद्वारे ED, CBI च्या विरोधात केजरीवाल-सिसोदियांनी ठोकला शड्डू वादात ओवेसींची उडी टिपू सुलतानने इंग्रजांशी चार वेळा युद्ध केले होते, असे AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. त्यांच्या बलिदानावर खोटेपणा पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. टिपू सुलतानने इंग्रजांविरुद्ध जे युद्ध केले ते आम्ही विसरू शकत नाही, असे ओवेसी यांनी शनिवारी सांगितले. आज आपण पाहत आहोत की मुस्लिमांचा द्वेष करणारे लोक टिपू सुलतानबद्दल खोटे बोलत आहेत. इलियास भटकळी यांचे टिपू सुलतानवरील पुस्तक वाचण्याचे आवाहन त्यांनी युवकांना केले. टिपू सुलतानच्या जीवनाविषयी जाणून घेतल्यावरच कळेल की इंग्रजांविरुद्ध कोणाचा लढा होता आणि ब्रिटिशांपासून स्वातंत्र्याचा मार्ग कोणता असावा, असे ओवेसी म्हणाले. ते पुढे म्हणाले की टिपू सुलतानला केवळ धर्माची माहिती नव्हती. तर पारशी, अरबी, कन्नड, फ्रेंच कसे लिहायचे आणि वाचायचे हे देखील माहित होते. ओवेसी पुढे म्हणाले की टिपूने इंग्रजांविरुद्ध 4 युद्धे केली आहेत, तर सावरकरांनी इंग्रजांना चार दयेची पत्रे लिहिली आहेत. आज देशात असे लोक आहेत जे टिपू सुलतानचा द्वेष करतात आणि टिपू सुलतानचे बलिदान पुसून टाकू इच्छितात. सावरकर-टिपू सुलतान वाद योगायोग की आणखी काही? गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक राज्यात मुस्लीम विरोधी वातावरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी हिजाबवरुनही असाच वाद निर्माण झाला होता. त्यानंतर टीपू सुलतानाचा इतिहासातील उल्लेखही बदलण्यात आला. त्यावरुनही गदारोळ झाला होता. आता सावरकर आणि टिपू सुलतान असा नवा वाद निर्माण झाला आहे. यात आता राजकीय पक्ष चढाओढीने भाग घेत आहे. राजकीय विश्लेषक या गोष्टींना निव्वळ योगायोग मानत नाही. पुढील वर्षी कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. आतापर्यंत इतर राज्यातील इतिहास पाहिला तर हिंदू-मुस्लीम वादाचा भाजपला जास्त फायदा झाला आहे. त्यामुळे या वादांमागे भाजप असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. ओवेसी यात उतरल्याने संशय आणखी वाढला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.