कर्नाटकची राजधानी बंगळूरुमधल्या हिंसाचाराने हे शहर सुन्न झालं आहे. संतप्त जमावाने रात्री प्रचंड हैदोस घातला. त्याने शहर हादरुन गेलं असून पोलिसांनी आता परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे.
जवामाला पांगविण्यासाठी पोलिसांनी गोळीबार देखील केला होता. या गोळीबारात 2 जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तर बंगळुरुच्या पुलकेशी नगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या नातेवाईकाने प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट पोस्ट शेअर केली होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकला.
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी एकाच ठिकाणी येत काँग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावर दगडफेक केली.
अनेक गाड्यांना आग लावण्यात आली तर हिंसाचार रोखण्यासाठी पुढे आलेल्या पोलिसांवरच दगड आणि बाटल्यांनी मारहाण करण्यात आली.
या प्रकरणात पोलिसांनी मी आमदाराचा पुतण्या असल्याचं सांगणाऱ्या नवीन नावाच्या एका युवकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता माझं फेसबूक अकाऊंट हॅक झाली असल्याची माहिती त्याने दिली. मी कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट केली नसल्याचं नवीनने पोलिसांना सांगितलं.