पौरी गढवाल, 21 मे : सध्या देशात हिंदू-मुस्लीम मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. अशात एका भाजप नेत्याने आपल्या मुलाची विवाह मुस्लीम तरुणासोबत ठरवला होता. या प्रकरणी आता मोठी बातमी समोर येत आहे. उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) स्थानिक नेत्याने लोकांच्या दबावाखाली आपल्या मुलीचा मुस्लिम तरुणाशी ठरवलेला विवाह रद्द केला आहे. विवाहाची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात विरोध झाला, त्यानंतर हे लग्न रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. भाजप नेते यशपाल बेनाम यांनी सांगितले की, ‘त्यांच्या मुलीचा पौरी गढवालमधील एका मुस्लिम तरुणासोबत 28 मे ला विवाह होणार होता. मात्र, त्याआधीच लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर शनिवारी वराच्या कुटुंबाच्या “परस्पर संमतीने” हा विवाह रद्द करण्यात आला. ते म्हणाले, ‘लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्या मुलीचे लग्न पोलीस आणि प्रशासनाच्या संरक्षणात व्हावे, अशी माझी इच्छा नव्हती. मी जनभावनांचा आदर करतो.’ दोघांच्या संमतीने होणार होते लग्न बेनाम यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही घरच्यांच्या संमतीने हे लग्न ठरले होते. मात्र, काही गोष्टी समोर आल्यानंतर तो मागे घ्यावा लागला. ते म्हणाले, ‘माझ्या मुलीचे एका मुस्लिम तरुणाशी लग्न होणार होते. मुलांचे सुख आणि भवितव्य लक्षात घेऊन दोन्ही कुटुंबांनी त्यांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, त्यासाठी कार्डही छापून वाटण्यात आले होते. लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या लग्नावर आक्षेप घेत अनेक प्रतिक्रिया उमटल्या.
लग्नाचे विधी न करण्याचा निर्णय भाजप नेत्याने सांगितले की, “वाद निर्माण झाल्यानंतर, परस्पर संमतीने, दोन्ही कुटुंबांनी सध्या लग्नाचे विधी न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आपल्या मुलीच्या लग्नाबाबतचा निर्णय कुटुंबीय, हितचिंतक आणि वराची बाजू यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.