धर्मशाला (हिमाचल प्रदेश), 25 फेब्रुवारी : रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या त्या पार्ट्यांमधील धिंगाणा यामुळे शेजारच्यांची झोप मोड होण्याचा प्रकार नवा नाही. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनाही याचा फटका बसला आहे. ठाकूर यांच्या शेजारच्या खोलीत पार्टी सुरु होती. त्याच्या त्रासामुळे अर्ध्या रात्री सर्कीट हाऊस (circuit house) सोडून हॉटेलमध्ये जाण्याची वेळ त्यांच्यावर आली. सोमवारी रात्रीचा हा सर्व प्रकार आहे.
अनुराग ठाकूर हे सध्या हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) कांगडा जिल्ह्यातील धर्मशालाच्या (Dharamshala) दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. ते धर्मशालेतील सर्किट हाऊसमध्ये मुक्कामाला होते. त्यांच्या शेजारच्या खोलीमध्ये पार्टी आणि नाच-गाणे सुरु होते. हा आवाज कमी करण्याची सूचना ठाकूर यांच्या सुरक्षा रक्षकांनी सुरुवातीला केली. त्यानंतर ठाकूर यांनी स्वत: येऊन सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलं, पण तरीही पार्टी करणाऱ्या मंडळीचा आवाज कमी झाला नाही. त्यामुळे ठाकूर यांना नाईलाजानं रात्रीतून पर्यटन विभागाच्या हॉटेलमध्ये मुक्काम हलवावा लागला.
प्रशासनात खळबळ
या सर्व प्रकरणाची माहिती मंगळवारी उघड होताच जिल्हा प्रशासनामध्ये खळबळ उडाली. प्रमुख अधिकाऱ्यांनी तातडीनं हॉटेलमध्ये जात ठाकूर यांची माफी मागितली. हिमाचल प्रदेशातील एका बड्या नेत्या परिवारातील लोकांचा गोंधळ घालणाऱ्या मंडळींमध्ये समावेश आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही, अशी माहिती आहे. आता हे सर्व प्रकरण दडपण्याचा प्रशासन प्रयत्न करत आहे.
(हे वाचा : 'हो आम्हीच कोरोना पसरवला', अखेर तबलिगी जमातीनं दिली गुन्ह्याची कबुली )
अनुराग ठाकूर यांनी अर्ध्या रात्री सर्कीट हाऊस सोडल्याची माहिती आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी मिळाली अशी माहिती कांगडाचे अतिरिकिक्त उपायुक्त राहुल कुमार यांनी दिली आहे. कांगडाचे पोलीस अधीक्षक विमुक्त रंजन यांनी ठाकूर यांनी अर्ध्या रात्री खोली सोडल्याचं मान्य केलं. शेजारच्या खोलीत सुरु असलेल्या पार्टीमुळे त्यांना हॉटेलमध्ये शिफ्ट व्हावं लागलं, अशी माहिती रंजन यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Himachal pradesh, India, Party