नोएडा : नोएडाच्या सेक्टर-93A मध्ये असलेले सुपरटेक ट्विन टॉवर्स पाडण्याची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. अवघ्या ९ सेकंदात हा टॉवर उद्ध्वस्त करण्यात येईल अशी चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या आजूबाजूच्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आपलं घरं तात्पुरतं सोडण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.
याचा फटका नोएडातील नागरिकांना बसणार आहे. सुपरटेक ट्विन टॉवरहून पुढे जाणाऱ्या वीज आणि गॅस पाईपचं कनेक्शन देखील उद्या बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होऊ शकतात. नागरिकांनी आपली कामं आजच पूर्ण करून घ्यावीत असं आवाहन करण्यात आलं आहे.
रविवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी लवकर लाईट आणि गॅस कनेक्शन बंद करण्यात येणार आहे. जवळपास १५०० कुटुंबाचं वीज कनेक्शन बंद असणार आहे. तर गॅस सप्लाय देखील बंद ठेवण्यात आला आहे.
हा टॉवर पाडण्याचं काम सुरळीत होण्यासाठी आणि कोणतीही अडचण येऊ नये म्हणून विशेष कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. तर देशात पहिल्यांदाच एवढी मोठी इमारत पाडली जाणार असल्याची घटना घडत आहे. त्यामुळे याकडे सर्वांच्या नजराही आहेत.
ही इमारत बांधताना नियमांचं उल्लंघन केल्याने स्थानिक लोक आणि संस्था सुपरटेक विरोधात कोर्टात गेले. अलाहबाद कोर्टाने दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवल्याने आता ही इमारत पाडण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी सुपरटेक स्वत: ५ कोटी रुपये खर्च देणार असल्याची माहिती मिळाली आहे.
हा टॉवर बरखास्त करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. रविवारी दुपारी 2.30 वाजता हा टॉवर पाडला जाणार आहे. या मार्गावरील वाहतूक देखील पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. तर आजूबाजूचा परिसर आणि इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.