मुंबई, 11 एप्रिल : प्रत्येकाचं स्वतःचं घर असावं असं स्वप्न असतं, इतकंच नव्हे तर ते घर कसं असावं, असंही त्यांचं स्वप्न असतं. एका शेतकरी तरुणाचं जहाजासारखं घर बांधण्याचं स्वप्न होतं. त्याला त्या स्वप्नाचा कधीही विसर पडला नाही. एकही इंजिनिअर त्याच्या स्वप्नातील घर बांधण्यास तयार नव्हता. तेव्हा त्यानं स्वत: घर बांधण्याचं काम शिकून आपलं स्वप्न पूर्ण केलंय. कसं बांधलं घर? मिंटू रॉय असं या शेतकरी तरूणाचं नाव आहे. तो पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यामधील हेलेंचा इथला मूळचा आहे. 20-25 वर्षांपूर्वी तो सिलीगुडीच्या फसिदावा भागात येऊन स्थायिक झाला. सध्या तो शेती करून उदरनिर्वाह करतो. तो वडील मनरंजन रॉय यांच्यासोबत सिलीगुडीला आला होता. तेव्हापासून आतापर्यंत बराच काळ उलटला आहे, पण मिंटूने त्याचं स्वप्नवत घर बांधण्याची त्याची इच्छा कधीच मरू दिली नाही. त्याने हळूहळू आपल्या स्वप्नातील जहाजाच्या आकारासारखं घर बांधायला सुरुवात केली.
मिंटू कोलकात्यात आला आणि तिथे राहू लागला, तेव्हापासून जहाजासारखं घर बांधण्याचं त्याचं स्वप्न होतं. नंतर त्याने हे जहाजासारखं घर बांधण्याचा प्लॅन बनवला; पण सुरुवातीला एकही इंजिनीअर त्याच्या या कल्पनेतलं घर बांधायला तयार झाला नाही. मग त्याने स्वतःच्या हाताने घर बांधायला सुरुवात केली. मात्र, पैशाअभावी काही वेळा काम रखडलं. गवंड्यांना पैसे देण्याची क्षमता त्याच्याकडे नव्हती. त्यानंतर तो स्वतः तीन वर्षे नेपाळला गेला, तिथे गवंडीकाम शिकून घरे बांधू लागला. आता तो त्याच्या स्वप्नातील जहाजाच्या आकाराचं घर हळूहळू बांधू लागला. रिक्षाचालकाचं बाबासाहेबांना अभिवादन, चक्क ऑटोवर साकारली दीक्षाभूमी! पाहा Video मिंटूनं दिलेल्या माहितीनुसार,‘हे शिप हाऊस बनवण्याचं काम त्याने 2010 मध्ये सुरू केलं होतं. हे जहाज 39 फूट लांब आणि 13 फूट रुंद आहे. सुमारे 30 फूट उंचीचं हे शिप हाउस परिसरातलं मुख्य आकर्षण बनलं आहे.’ मिंटूने अगदी जहाजासारखं घर बांधलं आहे. मिंटूने जमिनीवर शिप हाउस बांधून सर्वांना आश्चर्यचकित केलंय. मिंटूनं शेतीच्या उत्पादनातून हे घर बांधलंय.आजही हे काम सुरू आहे.या घराला आईचं नाव देण्याचं त्यानं ठरवलंय.घरासाठी आतापर्यंत अंदाजे 15 लाख रुपये खर्च झाले आहेत. “पुढच्या वर्षापर्यंत काम पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. मला नंतर वरच्या मजल्यावर एक रेस्टॉरंट बांधायचं आहे, तिथून मी उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करेन,” असं त्यानं सांगितलं.