कोलकाता 01 जून : प्लास्टिकचा कचरा पर्यावरणासाठी भस्मासुर ठरत आहे, याची प्रचीती जगात सर्वत्र येत आहे. प्लास्टिकबंदीचा उपाय अनेक ठिकाणी केला जातो. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. शिवाय प्लास्टिकला समर्थ पर्याय उपलब्ध नसल्याने प्लास्टिक वापराशिवाय गत्यंतर नाही. मात्र प्लास्टिकचा जबाबदारीने वापर करणं आणि त्याचा कचरा सर्वत्र न फेकता त्याचा योग्य पुनर्वापर करणं गरजेचं असल्याचं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. त्यासाठी अनेक प्रयोग केले जात असून, पश्चिम बंगालमध्ये अलीकडेच करण्यात आलेल्या एका प्रयोगाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पूर्व वर्धमानमधल्या रैना इथल्या उचलन ग्रामपंचायतीने प्लास्टिकचा कचरा डांबरात मिसळून त्यापासून
रस्ता
तयार केला आहे. निळ्या रंगाच्या या रस्त्यामुळे त्या परिसराचं सौंदर्य वाढलं असून, प्लास्टिकचा योग्य पुनर्वापर झाला आहे. हा रस्ता पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. हा रस्ता टिकाऊ असेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला असून, अशा प्रकारचे रस्ते आणखीही अनेक ठिकाणी बांधले जातील अशी आशा ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे.
रस्त्याच्या कडेला का लावले जातात विविध रंगाचे दगडं, प्रत्येक रंगाचा आहे वेगळा अर्थ
पावसाळ्यात डांबरी रस्त्यांना खड्डे पडतात. शिवाय, तीव्र उन्हाळा असेल, तर रस्त्यावरचं डांबर वितळतं. अरबी देशांत डांबरी रस्त्यांवर प्लास्टिकचा थर दिला जातो. त्यामुळे उन्हामुळे होणारी त्याची हानी टळते. त्या तंत्रज्ञानाचा विचार करून पश्चिम बंगालमध्ये हा प्रयोग करण्यात आला आहे. प्लास्टिकचा कचरा पर्यावरणाचं प्रदूषण करतो. प्लास्टिकचा हा कचरा डांबरात मिसळून त्यापासून रस्ता तयार करण्यात आला. त्यामुळे प्लास्टिकचा योग्य पुनर्वापर होत असून, दुसऱ्या बाजूला रस्ता अधिक टिकाऊ होण्यास मदत झाली आहे.
प्लास्टिकचा कचरा डांबरात मिसळून त्यापासून रस्ता तयार केला
एका इंजिनीअरने सांगितलं, ‘डांबरात प्लास्टिक मिसळल्यामुळे रस्त्याच्या आत पाणी घुसण्याचं प्रमाण कमी होईल. तसंच, रस्त्यावर निळ्या रंगाचा जाड थर देण्यात आला आहे. त्यामुळे पाण्यामुळे होणारं नुकसान टळायला मदत होईल. तसंच, सूर्याच्या उष्णतेचाही डांबरावर थेट परिणाम होणार नाही. त्यामुळे हा रस्ता उष्णतारोधी आणि जलरोधी म्हणजेच हीटप्रूफ आणि वॉटरप्रूफ बनला आहे. या प्रयोगामुळे रस्ता टिकण्याचा कालावधी दोन ते तीन पटींनी वाढला आहे.’ पूर्व वर्धमानमधल्या रैना टू ब्लॉकमधल्या उचलन भागातल्या एकलक्ष्मी भागात हा निळा रस्ता बांधण्यात आला आहे. हा रस्ता 320 मीटर लांबीचा असून, तो एकलक्ष्मी टोल प्लाझा आणि रौतारा ब्रिज ही दोन ठिकाणं जोडतो. हा रस्ता बांधण्यासाठी 22 लाख 94 हजार रुपये खर्च आला. त्यासाठी राज्य वित्त आयोगाकडून 14 लाख 15 हजार रुपये मिळाले, तर 8 लाख रुपये ग्रामपंचायतीने स्वतःच्या निधीतले वापरले.
वर्धमानमधल्या रैना इथल्या उचलन ग्रामपंचायतीचा प्रयोग
यासाठी भारतात घेतला गेलेला हा पहिलाच पुढाकार असल्याचा दावा रैना टू ब्लॉकच्या आमदार शम्पा धारा यांनी सांगितलं. ‘अशा प्रकारचे रस्ते सहसा वाळवंटात दिसतात. कारण त्या भागांत उष्णता खूप जास्त असते. त्यामुळे डांबर वितळतं. अशा प्रकारच्या रस्त्यांवर पाण्यामुळे खड्डे पडण्याचं प्रमाण कमी असून, डांबर वितळण्याचं प्रमाणही खूप कमी असतं.’ त्या भागातल्या एका स्थानिक नागरिकाने सांगितलं, ‘हा खूपच चांगला उपक्रम आहे. मी स्वतः या रस्त्यावरून ड्रायव्हिंग करतो. पावसातही त्यावरून घसरायला होत नाही. सध्या तरी त्यावरून प्रवास करायला खूप चांगलं वाटत आहे; मात्र तो किती दिवस टिकतो, ते पाहायचं.’ हा उपक्रम यशस्वी झाला, जास्त काळ टिकला आणि जास्तीत जास्त ठिकाणी राबवला गेला, तर प्लास्टिक कचरा कमी होण्यास आणि पर्यायाने जागतिक तापमानवाढीवर नियंत्रण आणण्यास मदत होऊ शकेल.