नवी दिल्ली, 24 डिसेंबर: गेल्या दोन वर्षांपासून जगभरात सुरू असलेलं कोरोना महामारीचं (Corona Pendamic) संकट पुन्हा गडद होण्याची शक्यता आहे. सध्या कोरोना व्हायरसच्या 'ओमिक्रॉन' (Omicron) या नवीन व्हेरियंटची दहशत पसरत आहे. ओमिक्रॉनबाबत जगभरातून भीतीदायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे. भारतातदेखील ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असून तो वेगाने पसरत आहे. भारतात आतापर्यंत 236 नागरिकांना त्याची लागण झालेली आहे. ओमिक्रॉन हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा (Delta variant) जवळजवळ तिप्पट वेगाने पसरतो आहे, त्यामुळं केंद्र सरकारनं (Central Government) सर्व राज्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनपूर्वी बंधनं (Covid restriction) घालण्यास सुरुवात झाली आहे. ओमिक्रॉनची वाढती प्रकरणं पाहता देशात कोरोनाची तिसरी लाट (COVID Third Wave) येण्याची शक्यता आरोग्यतज्ज्ञांनी वर्तवली आहे. आजतकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
या वर्षी एप्रिल-मेमध्ये भारतात कोरोनाची दुसरी लाट आली होती. या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. सरकारनं मार्चपासून नागरिकांसाठी लसीकरण (COVID Vaccination) सुरू केलं होतं. नेमकं त्याचं वेळी भारतात डेल्टाचा प्रवेश झाला. तोपर्यंत फक्त फ्रंटलाईन वर्कर्सलाचं (Frontline Workers) लस मिळालेली होती. इतर नागरिकांना लस मिळालेली नव्हती. त्यामुळे डेल्टा व्हेरियंटमुळे (Delta variant) देशात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी (2022) महिन्यात देशात ओमिक्रॉनचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची शक्यता आहे. मात्र, लसीकरणामुळे नागरिकांची इम्युनिटी पॉवर सध्या चांगली आहे. परिणामी तिसरी लाट जरी आली तरी तुलनेनं ती कमी घातक असेल, अशी माहिती नॅशनल कोविड -19 सुपरमॉडेल कमिटीचे (National Covid-19 Supermodel Committee) सदस्य विद्यासागर (Vidyasagar) यांनी एएनआयला दिली.
विद्यासागर म्हणाले, 'कोविड लस 95 टक्क्यांपर्यंत नागरिकांचं महामारीपासून संरक्षण करते. सध्या देशात सेरोचं प्रमाण 75 ते 80 टक्के आहे. 85 टक्के लोकांना लसीचा (Vaccine) पहिला डोस मिळाला आहे तर, 55 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. त्यामुळे तिसरी लाट आली तर तीची तीव्रता दुसऱ्या लाटेइतकी नक्कीच नसेल. दुसऱ्या लाटेचा अनुभव गाठीशी असल्यामुळं देशातील आरोग्ययंत्रणा कोणत्याही अडचणींशिवाय कोविडचा सामना करू शकते.'
हैदराबादमधील आयआयटीचे प्राध्यापक विद्यासागर म्हणाले की, कोविड प्रकरणांची संख्या दोन गोष्टींवर अवलंबून असेल. पहिली गोष्ट म्हणजे, डेल्टामधून मिळालेल्या नॅचरल इम्युनिटीला (Natural immunity) ओमिक्रॉन किती प्रमाणात बायपास करतो. दुसरी गोष्ट म्हणजे, लसीपासून मिळालेल्या इम्युनिटीचा तो किती प्रमाणात सामना करू शकतो. सध्या या दोन्ही गोष्टींची संपूर्ण माहिती उपलब्ध नाही. देशात कोरोनाची तिसरी लाट जेव्हा सर्वात जास्त वाईट स्थितीमध्ये असेल तेव्हा दिवसाकाठी आढळणाऱ्या रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा कमी असेल. मात्र, हा फक्त अंदाज असल्याचं विद्यासागर यांनी स्पष्ट केलं आहे.
'भारतीय लोकसंख्येमध्ये ओमिक्रॉन कशा प्रकारे तग धरतो आहे, हे समजल्यानंतर त्याबाबत ठोस अनुमान काढता येईल. कितीही सर्वात वाईट परिस्थिती निर्माण झाली तरी दिवसाला 1.7 ते 1.8 लाखांच्या खालीच रुग्णसंख्या राहील. ही आकडेवारी दुसऱ्या लाटेतील सर्वोच्च रुग्णसंख्येच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे, असंही प्राध्यापक विद्यासागर म्हणाले.
नोव्हेंबर महिन्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळला होता. यानंतर, हा व्हेरियंट जगभरातील 100 देशांमध्ये पसरला आहे. बहुतेक युरोपियन देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे आणि यातील बहुतेक प्रकरणं ही ओमिक्रॉनची आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात काळजी घेतली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona hotspot, Corona spread, Corona updates, Covid-19