मेघालय, 9 जुलै : आपल्या देशाच्या ईशान्येकडच्या सात राज्यांचा प्रदेश वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यातलंच एक राज्य म्हणजे मेघालय (Meghalaya). या मेघालयची राजधानी शिलाँगपासून 65 किलोमीटर अंतरावर 700 लोकवस्तीचं कोंगथांग (Kongthang) नावाचं एक गाव असून, ते व्हिसलिंग व्हिलेज (Whistling Village) म्हणून ओळखलं जातं. कारण या गावात कोणाला नाव विचारलं तर तो बोलून नाही, तर विशिष्ट सुरांत गाऊन आपलं नाव सांगतो. याविषयीचं वृत्त 'टीव्ही 9 हिंदी'ने दिलं आहे.
कोंगथांगमधले 36 वर्षांचे सामाजिक कार्यकर्ते रोथेल खोंगस्ती यांनी एका मुलाखतीत या परंपरेविषयी माहिती दिली. जेव्हा मूल जन्माला येतं किंवा मूल गर्भामध्ये वाढत असतं तेव्हाच आई त्याच्यासाठी एक धून तयार करते. त्यानंतर हाच सूर त्याचं नाव म्हणून वापरला जातो आणि तो हळूहळू समाजातल्या सर्व लोकापर्यंत पोहोचवला जातो, असं त्यांनी सांगितलं. या भाषेला जिंजरवेई लॉबेई असं नाव आहे आणि ती कोणत्याही शाळेत शिकवली जात नाही.
सध्याचा जमाना कॉपी-पेस्टचा आहे. त्यामुळे अनेक गोष्टींची सर्रास कॉपी होताना दिसते; पण या खूप जुन्या परंपरेत मात्र कसलीच कॉपी होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. मूल मोठं होत जातं, तसतसा हा सूर त्याची ओळख बनतो आणि त्याच्या व्यक्तीच्या मृत्यूसोबत तो सूर लोपही पावतो.
हे ही वाचा कडकनाथच्या नावानं चांगभलं! रोगप्रतिकार शक्तीसाठी उपयुक्त असल्याचा दावावैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने नाव सांगण्याच्या या गावातल्या प्रथेला अनेक शतकांची परंपरा आहे. त्यामुळे युनेस्कोच्या (UNUSCO) कल्चरल हेरिटेज लिस्ट (Cultural Heritage List) अर्थात सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी या गावाचे प्रयत्न सुरू आहेत. कॅनरीमधील सिब्लो नावाच्या गावाचा समावेश या यादीत 2013 मध्ये करण्यात आला आहे. 2017मध्ये टर्कीची 'बर्ड लँग्वेज'देखील युनेस्कोने त्यात समाविष्ट केली होती. सिल्बोमध्ये 22 हजार आणि टर्कीमध्ये10 हजार जण ती-ती वैशिष्ट्यपूर्ण भाषा बोलतात. कोंगथांगमध्ये 700 जणांनी ती भाषा जपण्याचा प्रयत्न केला आहे.
ही भाषा कोंगथांगमधल्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ही भाषा त्यांच्या पूर्वजांचा आदर करण्याचा एक मार्ग आहे, असं गावातल्या लोकांना वाटतं. या परंपरेशी संबंधित अनेक प्रथा आहेत. ही परंपरा सध्या जिवंत आहे; पण आता ती लोप पावण्याची गावातल्या नागरिकांना चिंता वाटत आहे. कारण जेव्हा नवीन पिढीतली मुलं गाव सोडून दुसरीकडे जातात, तेव्हा ही परंपरा जपत नाहीत. त्यामुळे ते आपली संस्कृती विसरत आहेत, असं ग्रामस्थांना वाटतं. चांगलं शिक्षण घेण्यासाठी गावाबाहेर जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जुन्या पिढीतल्या लोकांनी ही संस्कृती जपण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. युनेस्कोने दखल घेतली, तर चांगला उपयोग होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Meghalaya, Sang a song