नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : देशभरात इंजिनीअरिंग (Engineering) आणि मेडिकल (Medical) प्रवेश पूर्व परीक्षेसाठी एकच कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट-अंडर ग्रॅज्युएट (CUET-UG) परीक्षा घेण्याचा विचार विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (University Grant Commission) केला जात आहे. त्या दृष्टीने योजनेच्या मसुद्यावर काम सुरू आहे.
गणित (Mathematics), भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry) , जीवशास्त्र (Biology) या चार विषयांच्या परीक्षा देण्याऐवजी विद्यार्थी एकच प्रवेश परीक्षा देऊन नंतर विविध विषयांचा अभ्यासक्रम निवडून त्यांच्या आवडीचे क्षेत्रात जाऊ शकतात, असं यूजीसीचे अध्यक्ष एम.जगदीश कुमार यांनी म्हटलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भात दिलेल्या वृत्तानुसार, या परीक्षांशी संबंधित विविध संस्थांशी व घटकांशी चर्चा करण्यासाठी यूजीसी एक समिती स्थापन करणार आहे. विद्यार्थ्यांना एकाच ज्ञानावर आधारित अनेक प्रवेश परीक्षांत सहभागी होण्याची गरज पडू नये. तसंच एकच परीक्षा देऊन त्यांना विविध क्षेत्रांत प्रवेशाची संधी मिळावी म्हणून सर्व प्रवेश परीक्षांना एकत्रित करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव समोर आल्याचं जगदीश कुमार यांनी म्हटलं आहे.
देशात सध्या तीन मोठ्या प्रवेश परीक्षा होतात. यात इंजिनीअरिंगसाठी सामाईक प्रवेश परीक्षा (मुख्य) (CET), राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेसह (NEET) कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट-अंडर ग्रॅज्युएट (CUET-UT) यांचा समावेश होतो. देशातील सुमारे 43 लाख विद्यार्थी या परीक्षा देतात. यातील बहुतांश विद्यार्थ्यांचा ओढा हा अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षकडे असतो. जेईई मेन्समध्ये (JEE Mains) विद्यार्थ्यांना गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राची परीक्षा द्यावी लागते. तर वैद्यकीयच्या ‘नीट’मध्ये गणिताच्या जागी जीवशास्त्र विषयाचा समावेश होतो. हे विषय कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट-अंडर ग्रॅज्युएटच्या 61 डोमेन विषयांचा भाग आहेत.
विद्यार्थ्यांवर अनेक परीक्षांमध्ये सहभागी होण्याचा ताण पडू नये आणि विषयांमधील त्यांच्या ज्ञानाचं आकलन व्हावं या उद्देशाने हा प्रस्ताव समोर आल्याचं जगदीश कुमार यांनी म्हटलं आहे. सध्या इंजिनीअरिंग, मेडिकल तसंच विद्यापीठांमध्ये इतर विषयांचे पर्याय उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग आणि मेडिकलचं शिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आवश्यक विषयांच्या आधारावर गुणवत्तेची मानकं (Merit) ठरवली जातील. तर ज्या विद्यार्थ्यांना या दोन क्षेत्रांकडे वळायचं नसेल त्यांच्यासाठी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट-अंडर ग्रॅज्युएट अंतर्गत विविध अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करता येऊ शकेल.
भारतामध्ये विशेषत: इंजिनीअरिंग आणि मेडिकल क्षेत्राच्या प्रवेश पूर्व परीक्षांना लाखो विद्यार्थी बसतात. वेगवेगळ्या परीक्षा देताना त्यांच्यावर अभ्यासाचा ताणदेखील वाढतो. हा ताण कमी करून त्यांना आवडत्या क्षेत्रात करिअरची संधी मिळावी म्हणून यूजीसीकडून देश पातळीवर एकच प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्यास तो विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ठरू शकतो.