नवी दिल्ली, 28 एप्रिल : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. भारत कोरोनाग्रस्तांचा 30 हजारांचा टप्पा पार करण्याच्या उंबरठ्यावर असून ताज्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत 29 हजार 435 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर मृत्यू आतापर्यंत 934 जणांना आपला जीव गमावला आहे. गंभीर बाब म्हणजे गेल्या 24 तासात 1,543 नवीन प्रकरणे तर 24 तासांत 62 मृत्यू झाले आहेत. 24 तासांत आतापर्यंत झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत. एकीकडे देशभर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये कोरोना विषाणूचा वुहानमधील एल प्रकार अस्तित्वात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भागात एल प्रकारच्या कोरोनाने शिरकाव केल्याने तेथे मृत्यूदर अधिक आहे, अशी शंका तज्ञांनी व्यक्त केली आहे. वुहानमधील एल प्रकारचा करोना विषाणू हा घातक मानला जातो. एस प्रकारचा कोरोना विषाणू तुलनेने कमी घातक असतो. गुजरातमध्ये एल प्रकारचा आक्रमक विषाणू पसरला आहे. त्यामुळे तेथे आतापर्यंत 133 बळी गेले आहेत, असं सांगण्यात येत आहे. मात्र गुजरातमधील कोरोना विषाणूचा उपप्रकार कोणता याची निश्चिती अजून झालेली नाही. हेही वाचा - 40 दिवस 19 पॉझिटिव्ह टेस्ट! अखेर तरुणानं कोरोनाला हरवून मिळवला डिस्चार्ज गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरच्या एका वैज्ञानिकाने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या केंद्रात विषाणूचा जनुकीय आराखडा तयार करण्यात आला असता तो कोरोना विषाणू एल उपप्रकारातील निघाला आहे. जर खरोखरच हा घातक प्रकार गुजरातमध्ये आला असेल तर पुढील काही दिवस नागरिक आणि आरोग्य यंत्रणेला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







