हैदराबाद, 22 मार्च : महाराष्ट्रातल्या सर्वांत लोकप्रिय पदार्थांपैकी एक असलेल्या पावभाजीने आता राज्याच्या सीमा ओलांडल्या आहेत. हा चविष्ट पदार्थ आता सर्वांच्या आवडीचा बनला आहे. कोणे एके काळी पावभाजी केवळ मुंबईपुरतीच मर्यादित होती. त्यानंतर ती महाराष्ट्रातल्या अनेक लहान-मोठ्या शहरांमध्ये पोहोचली. कालांतराने या पदार्थाने राज्याबाहेरही प्रसिद्धी मिळवली. आता पावभाजीचा स्टॉल राज्यात, तसंच राज्याबाहेरदेखील एक किफायतशीर व्यवसाय ठरला आहे. पावभाजीला असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन तेलंगणमधल्या पेड्डापल्ली जिल्ह्यातल्या संतोष या तरुणाने पावभाजी स्नॅक पॉइंट सुरू केला आहे. त्याने अल्पावधीतच पावभाजी विक्री व्यवसायात चांगलं यश मिळवलं आहे.
संतोषचं शिक्षण अद्याप पूर्ण झालेलं नाही. तो अद्याप स्थानिक महाविद्यालयात पदवीचं शिक्षण घेत आहे. शिक्षणाचा खर्च आणि फीसाठी त्याने त्याच्यातलं सुप्त कौशल्य आजमावण्याचा निर्णय घेतला. पावभाजीची ही डिश खूप लोकप्रिय असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने पावभाजी स्टॉल सुरू करण्याचा निर्णय घेतला.
पावभाजीसाठी लागणारं सर्व साहित्य, तसंच भाजी तो घरीच तयार करतो. साहित्य आणि भाजी तयार करताना स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते. सर्व पूर्वतयारी केलेली असल्याने संतोष ऑर्डर मिळताच ग्राहकांना अगदी पाच मिनिटांत पावभाजी सर्व्ह करतो.
वाचा - सरकारी नोकरी हवीये ना? मग 10वीनंतर लगेच सुरु करा 'हे' कोर्सेस; लाखो रुपये पगार
बटर पावभाजी ही त्याची खासियत आहे. संतोष तव्यावर बटर घालतो. बटर वितळल्यावर पाव मधोमध कापतो आणि वितळलेल्या बटरवर पाव लाल होईपर्यंत भाजतो आणि भाजीसह गरमगरम पाव सर्व्ह करतो.
संतोष कॉलेज सुटल्याल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता त्याचा स्टॉल उघडतो. त्याचा पावभाजी स्टॉल सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असतो. या व्यवसायातून रोज सुमारे दोन हजार मिळतात, असं संतोष सांगतो. पेड्डापल्लीतल्या समवयस्क तरुणांसाठी संतोषचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.
गेल्या वर्षी बिहारमध्ये बीटेकचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने शिक्षण घेत असतानाच चहाचा स्टॉल सुरू केल्याचं व्हायरल झालं होतं. वर्तिका सिंगला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. बीटेक पदवी घेण्यासाठी ती फरिदाबादला आली. वर्तिकाने आपलं ध्येय प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आवश्यक ती मेहनत सुरू करण्याचा निर्णय घेतला. तिनं फरिदाबादमध्ये बीटेक चायवाली नावाचं चहा विक्रीचं दुकान सुरू केलं. शिक्षण सुरू असतानाच व्यवसायात पाऊल ठेवून त्यात यश मिळवल्याची ही दोन उदाहरणं आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.