नवी दिल्ली, 26 जून : पावसाळा सुरू झाला आहे आणि विजेच्या तारा उघड्यावर असल्याने करंट लागण्याच्या घटना घडत आहेत, त्यामुळे डिस्कॉम कंपनी बीएसईएसने लोकांना विजेच्या खांबांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच वीजचोरी करू नका व पाणी साचत असलेल्या परिसरात जाऊ नका असंही त्यांनी आवाहनात म्हटलं आहे. रविवारी सकाळी पाऊस सुरू असताना नवी दिल्ली रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्समध्ये 34 वर्षीय शिक्षिका साक्षी आहुजाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्यानंतर बीएसईएसकडून हे आवाहन केलं आहे. या संदर्भात ‘झी न्यूज’ने वृत्त दिलंय. परिसरात विजेच्या उघड्या तारा किंवा तत्सम काही आढळल्यास 19123 (दक्षिण व पश्चिम दिल्ली) 19122 (पूर्व व मध्य दिल्ली) या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. मुलांना विजेच्या खांबांजवळ खेळू देऊ नका, असंही आवाहनात म्हटलंय.
“मीटर केबिनमध्ये पाणी साचल्यास किंवा लीकेज झाल्यास मुख्य स्विच बंद करा. दुरुस्तीनंतर तपासणीसाठी मुख्य स्विच चालू करा. विजेचा धक्का लागू नये या साठी अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर (ELCB) बसवा,” असंही अॅडव्हायझरीमध्ये म्हटलं आहे. रेल्वे स्टेशनवर शिक्षिकेचा मृत्यू नवी दिल्ली रेल्वे स्थानक कॉम्प्लेक्समध्ये रविवारी सकाळी पाऊस पडत असताना साक्षी आहुजा या 34वर्षीय महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व विद्युत खांब आणि इलेक्ट्रिसिटी इन्स्फास्ट्रक्चरचे सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतलाय. ही घटना स्टेशनच्या एक्झिट गेट क्रमांक 1 जवळ घडली. साक्षी तिच्या कुटुंबासह चंडिगडला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी जात होती. घटनेच्या वेळी ती तिचे वडील, आई, भाऊ, बहीण आणि दोन मुलांसोबत होती. प्रीत विहार इथे कुटुंबासह राहणारी आहुजा ही लव्हली पब्लिक स्कूल, प्रियदर्शनी विहार, लक्ष्मी नगर इथं शिक्षिका होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. Odisha Bus Accident: लग्नाचा आनंदांचं क्षणात दु:खात रुपांतर! 2 बसचा भीषण अपघात, 11 वऱ्हाडींचा जागीच मृत्यू प्राथमिक चौकशीनुसार, पाऊस पडत होता आणि साक्षी स्टेशनच्या दिशेने चालत असताना तिचा तोल गेला आणि तिने विजेचा खांब पकडला. या वेळी घटनास्थळी पडलेल्या उघड्या तारांच्या संपर्कात आल्याने करंट लागून तिचा मृत्यू झाला, असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. सहाय्यक उपनिरीक्षक गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी साक्षीला लेडी हार्डिंज मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेलं, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं, असं पोलीस उपायुक्त (रेल्वे) अपूर्वा गुप्ता यांनी सांगितलं. कुटुंबियांचे आरोप साक्षी आहुजाची बहीण माधवी चोप्रा हिने अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. अज्ञात व्यक्तींविरुद्ध कलम 287 (मशिनरी संदर्भातील निष्काळजीपणा) आणि 304 अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. आम्ही भारतीय रेल्वेतील अधिकाऱ्यांशी बोललो आहोत, ते या निष्काळजीपणासाठी कोण जबाबदार आहे याचा तपास करण्यासाठी प्रकरणाची चौकशी करत आहेत, असंही अपूर्वा गुप्ता यांनी सांगितलं. “क्राइम टीम आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, रोहिणी येथील तज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे,” असं डीसीपी म्हणाल्या. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सर्वजण एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसने चंडीगडला जात होते. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं होतं, त्यामुळे घसरून पडण्याची भीती वाटत होती, अशातच साक्षीला खांबाला पकडावं लागलं. रस्त्यावर पाणी साचलं होतं, तिथेच विजेच्या तारा उघड्यावर पडल्याने तिला विजेचा शॉक लागला आणि ती कोसळली. मॉडेल टाऊनचे रहिवासी असलेले साक्षीचे वडील लोकेश चोप्रा यांनी सांगितलं की, ते गेट क्रमांक 1 जवळ कारमधून उतरले आणि स्टेशनच्या दिशेने चालत असताना त्यांना अचानक माधवी ओरडल्याचा आवाज आला. ती साक्षीसाठी मदत मागत होती. “साक्षीला रस्त्यावर पडलेलं पाहून मला धक्का बसला आणि मी घाबरलो होतो. आम्हाला मदत करायला कोणीही नव्हतं. मुलं रडत होती,” असं ते म्हणाले. साक्षीच्या वडिलांनी अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केलाय. त्यामुळेच त्यांच्या मुलीचा जीव गेल्याचं ते म्हणाले. “आम्ही अरुंद रस्त्यावरून चालत नव्हतो. हा नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या गेट क्रमांक 1 च्या बाहेरचा मुख्य रस्ता होता आणि जंक्शनवरच पोल होता. तिथे किमान अर्धा डझन वायर उघड्या आहेत. या विजेच्या तारा झाकण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक ते उपाय केलेले नाहीत. शिवाय रस्त्यावर पाणी साचलं होतं,” असं ते म्हणाले. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितलं की ते एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते आणि सर्वजण खूप आनंदी होते. पण असं काही दुर्दैवी आणि दुःखद घडू शकतं असा विचारही केला नव्हता. ही घटना रेल्वे स्थानकाच्या बाहेरच घडली, परंतु विजेचा धक्का बसण्याची भीती असल्याने कोणीही त्यांच्या मदतीला आलं नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे आम्ही साक्षीला वाचवण्यासाठी लाकडी दांडक्यांचा वापर केला पण तरीही आम्ही तिला वाचवू शकलो नाही. माधवीलाही तिच्या बहिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात विजेचा धक्का बसला, असं कुटुंबातील एका सदस्याने सांगितलं. “घटनेनंतर मुलं खूप रडत आहेत, त्यांनी त्यांच्या आईला त्यांच्यासमोर बेशुद्ध पडताना पाहिलं आणि तिला नेमकं काय झालंय ते समजू शकले नाही,” असंही ते म्हणाले. या महिलेच्या पश्चात तिचा पती आणि दोन मुलं आहेत. पती अंकित आहुजा हा एका जपानी फर्ममध्ये इंजिनिअर म्हणून काम करतो आणि 10 त्यांना वर्षांचा मुलगा राघव आणि सहा वर्षांची मुलगी अनन्या आहे.