नवी दिल्ली, 18 जुलै : भारतात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सलग लॉकडाऊन…अनलॉक आणि आता पुन्हा काही ठिकाणी लॉकडाऊन अशा प्रक्रियेनंतरही वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. अशातच कोरोनाबाधित मुलांमध्ये आणखी एका आजाराची लक्षणं आढळत असल्याचं समोर आलं आहे. राजधानी दिल्लीतील अनेक रुग्णालयात कोरोनाची बाधा झालेल्या लहानग्यांमध्ये कावासाकी नावाच्या आजाराची लक्षणं आढळून आली आहेत. यामध्ये शरीरावर सूज येणे…जखम होणे अशा लक्षणांचा समावेश आहे. कावासाकी हा आजार नेमका कशामुळे होतो, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. हा आजार पाच वर्षांखालील मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो, तसंच त्यामुळे तापही वाढतो, असं सांगितलं जात आहे. मागील काही महिन्यांपासून दिल्लीतील विविध रुग्णालयांमध्ये कावासाकी आजाराची लक्षणं दिसत असून ही सगळी मुले कोरोना पॉझिटिव्ह आहेत. एका लहानग्याचा मृत्यू ‘सूज येणे…जखम होणे ही सगळी कावासाकी आजाराची सामान्य लक्षणे आहेत, जी जगभरात आढळून येतात. या आजारामुळे दिल्लीत एका मुलाचा मृत्यू झाला आहे,’ अशी माहिती कलावती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. वीरेंद्र कुमार यांनी दिली आहे दरम्यान, सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लोकांकडून कोरोनाच्या लशीची प्रतीक्षा आहे. सध्या विविध पर्यायांचा उपयोग करीत कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







