Home /News /national /

महिलेच्या मृत्यूनंतर 18 वर्षांनी कुटुंबाला न्याय; वैद्यकीय निष्काळजीपणाची डॉक्टर चुकवणार किंमत

महिलेच्या मृत्यूनंतर 18 वर्षांनी कुटुंबाला न्याय; वैद्यकीय निष्काळजीपणाची डॉक्टर चुकवणार किंमत

पित्ताशय अर्थात गॉल ब्लॅडरमधून (gall bladder) स्टोन काढल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात 18 वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एक मोठा निर्णय दिला आहे.

    चंडीगड, 11 जून : पित्ताशय अर्थात गॉल ब्लॅडरमधून (gall bladder) स्टोन काढल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात 18 वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एक मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणी पतियाळा इथल्या एका डॉक्टरला 'वैद्यकीय निष्काळजीपणा' केल्याप्रकरणी दोषी धरण्यात आलं आहे. तसंच डॉक्टरने पीडित कुटुंबाला 25 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कोर्टाने पतियाळा इथलं प्रीत सर्जिकल सेंटर आणि मॅटर्निटी हॉस्पिटल चालवणारे लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. गुरमीत सिंग यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भातलं वृत्त 'इंडियन एक्सप्रेस'ने दिलं आहे. दयानंद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (डीएमसीएच), लुधियाना इथल्या सर्जरी विभागाचे प्राध्यापक डॉ. अतुल मिश्रा कोणत्याही वैद्यकीय निष्काळजीपणासाठी दोषी आढळले नाहीत, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. रुग्णाची प्रकृती बिघडल्यानंतर तिला या ठिकाणी उपचारासाठी नेण्यात आलं होतं. काय आहे प्रकरण? पतियाळामधल्या सेवक कॉलनीतील राहत असलेले हरनेक सिंग यांची पत्नी मनजीत कौर (47) यांच्या पोटात दुखत होतं आणि त्यांना गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन असल्याचं निदान झालं होतं. 13 जुलै 2004 रोजी त्यांनी डॉ. गुरमीत सिंग यांच्याशी संपर्क साधला आणि ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. हरनेक सिंग यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे की, '28 जुलै 2004 रोजी डॉ. गुरमीत सिंग यांनी लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टोमी (Laparoscopic Cholecystectomy ) केली आणि रुग्णाच्या पोटात एक ट्यूब टाकली. त्यानंतर 29 जुलै 2004 रोजी रुग्णाने ओटीपोटात दुखत असल्याची आणि ताण येत असल्याची तक्रार केली. याबाबत डॉक्टरांना माहिती दिली असता त्यांनी हे नॉर्मल असल्याचं सांगितलं. परंतु दुसऱ्याच दिवशी रुग्णाची प्रकृती चिंताजनक झाली. मृत महिलेच्या पतीने तक्रारीत म्हटलं आहे, की डॉ. गुरमीत सिंग यांनी आम्हाला धीर दिला आणि रुग्णाला ऑक्सिजन देण्यास सुरुवात केली. आम्ही 'राजींद्र हॉस्पिटल, पतियाळा' येथे रेफर करण्याची विनंती डॉक्टरांना केली होती; पण रुग्ण सुरक्षित हातांत असल्याचं आश्वासन देऊन आमची विनंती नाकारण्यात आली. त्यानंतर रुग्णाला त्रास होण्याचं कारण स्वादुपिंडामध्ये होणारा दाह हे होतं आणि शस्त्रक्रियेत काहीही चूक झाली नव्हती, असं संध्याकाळी डॉ. गुरमीत सिंग यांनी आम्हाला सांगितलं.' कुतुबमिनार प्रकरणाला नवं वळण, 'या' संस्थानिकानं केला मालकी हक्काचा दावा या तक्रारीनुसार, 30 जुलै 2004 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास डॉ. गुरमीत सिंग यांनी रुग्णाला डीएमसीएच, लुधियाना येथे हलवण्याचा आणि रुग्णाला डॉ. अतुल मिश्रा यांच्याकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. परंतु डॉ. गुरमीत सिंग यांनी रुग्णाच्या नोंदी आणि ऑपरेशन नोट्स देण्यास नकार दिला. डीएमसीएचमधल्या डॉक्टरांना परिस्थितीबद्दल पुरेसं समजावून सांगण्यात आलं होतं. डीएमसीएचच्या मूल्यांकनानुसार, आधीच्या शस्त्रक्रियेदरम्यान, पित्त नलिका आणि आतड्याला आयट्रोजेनिक इजा झाल्याचा संशय होता. दरम्यान, 2 ऑगस्ट 2004 रोजी रुग्णाची प्रकृती गंभीर झाली आणि 11 ऑगस्ट 2004 रोजी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी डॉ. गुरमीत सिंग यांच्या निष्काळजीपणाबद्दल तक्रार दाखल केली होती. तब्बल 18 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला असून, डॉक्टरने पीडित कुटुंबाला 25 लाख रुपयांची भरपाई द्यावी, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
    First published:

    Tags: Punjab, Supreme court, Supreme court decision

    पुढील बातम्या