वॉशिंग्टन, 18 डिसेंबर : लष्कर-ए-तोयबा (lashkar-e-taiba), जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed), हिज्बुल मुजाहिदीन (Hizbul Mujahideen), आयएसआयएस (ISIS) आणि अल-कायदा ( Al-Qaeda ) यांसारख्या दहशतवादी संघटना भारतीय उपखंडात सक्रिय आहेत. जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत आणि मध्य भारत हे नक्षलवादी, दहशतवादी कारवायांमुळे प्रभावित झालेले क्षेत्र आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या दहशतवादावरील ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी '2020 कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम' हा अहवाल प्रसिद्ध झाला. भारत सरकारने त्यांच्या सीमेवर दहशतवादी संघटना सक्रिय आहेत की नाही, हे शोधण्यासाठी तसंच या संघटनांना रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले आहेत. परंतु अद्यापही धोका कायम आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
दरवर्षी हा अहवाल प्रकाशित होतो. यंदा प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे की, 'भारतात 2020 मध्ये दहशतवादाने केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत आणि मध्य भारतात माओवादाचे वर्चस्व असणाऱ्या क्षेत्राला प्रभावित केलं आहे. भारतीय उपखंडात लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, हिज्बुल मुजाहिदीन, आयएसआयएस आणि अल कायदासह प्रमुख दहशतवादी गट सक्रिय आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी जम्मू-काश्मीर येथे अल कायदाशी संबंधित 'अन्सार गजवत उल हिंद' या संघटनेच्या दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईची उदाहरणंदेखील या अहवालात देण्यात आली आहेत.
सप्टेंबर 2020 मध्ये अमेरिका आणि भारत यांच्यात दहशतवादविरोधी संयुक्त कार्यगटाची 17 वी बैठक झाली. तसेच तिसरी 'यूएस-इंडिया डेजिग्नेशन डॉयलॉग' परिषददेखील आयोजित करण्यात आली होती. अहवालात म्हटले आहे की, 'डिसेंबरमध्ये भारताने अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानसोबत आणखी एक क्वाड-दहशतवाद विरोधी सराव आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. ईशान्येत नक्षलवादी गट सक्रिय आहेत, पण दहशतवादी हिंसाचाराचे प्रमाण कमी झाले आहे. देशात खलिस्तानी गटांची सक्रियता कमी झाल्याचा उल्लेखही या अहवालात केला आहे.
'शीख फुटीरतावादी (खलिस्तान) चळवळीमध्ये सामील असलेल्या अनेक संघटना भारताच्या सीमेतील महत्त्वाच्या कारवायांमध्ये गुंतलेल्या नाहीत,' असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय सुरक्षा एजन्सी दहशतवादापासून देशाला असणारे धोके रोखण्यासाठी सक्षम आहेत, परंतु आंतर-एजन्सी इंटेलिजन्स आणि माहितीची देवाणघेवाण यामधील अंतर अद्याप कायम आहे. अहवालानुसार, 'भारतीय सुरक्षा दलं विस्तृत सागरी आणि भू सीमा सुरक्षित करण्यासाठी मर्यादित क्षमतेचा वापर करताना दिसतात.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Terrorism, Terrorists