नवी दिल्ली 16 जानेवारी : भाजपचे बंडखोर आणि स्टार खासदार शत्रूघ्न सिन्हा यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर पुन्हा एकदा शेरेबाजी केली आहे. या आधाही सिन्हा यांनी त्यांच्यावर टीका केली होती. शत्रूघ्न सिन्हा हे गेली काही वर्ष भाजपमध्ये नाराज असूनही सातत्याने सरकारवर टीका करतात. त्यांना कुठलंही पद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, " मंत्री कुणाला करावं हा पंतप्रधानांचा विशेषाधिकार आहे. पण एखाद्या अभिनेत्रीला थेट मनुष्यबळ विकास मंत्रालय देणं कितपत योग्य होतं?" असा थेट सवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे. स्मृती इराणी यांच्याकडे सध्या वस्त्रोद्योग मंत्रालय असलं तरी त्याआधी त्यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालय होतं. त्यावेळी सातत्याने ते मंत्रालय वादात राहिलं होतं. कधी त्यांच्या निर्णयामुळे तर कधी वक्तव्यांमुळे सतत त्यांच्याविषयी वाद निर्माण झाले होते. त्यानंतर त्यांच्याकडचं खातं बदलून त्यांना वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आलं आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाची सूत्रं प्रकाश जावडेकर यांच्याकडे देण्यात आली होती. शत्रूघ्न सिन्हा हे यशवंत सिन्हा यांच्यासोबत कायम सरकारवर टीका करत असतात. बिहारमध्ये त्यांनी लालू प्रसाद यादव यांची कायम स्तुती केली आहे. 2019 मध्ये भाजपकडून तिकिट मिळणार नाही याची त्यांना जाणीव असल्याने ते राजदकडून तिकिट मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचंही बोललं जातंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वाजपेयी सरकारच्या काळात चित्रपट क्षेत्रातून आलेल्या सिन्हांना मंत्रीपद देण्यात आलं होतं. Special Report : …तर विदर्भात शिवसेनेचे पानिपत होणार? पाहा खास सर्व्हे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.