मुंबई, 18 जानेवारी : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi Accident) यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला आहे. या अपघातात शबाना आझमी यांच्या तोंडाला मार लागला असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर शबाना आझमी यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथील उपचारानंतर आझमी यांना पुढील उपचारासाठी कोकीलाबेन रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. शबाना आझमी यांच्या अपघातानंतर त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात ट्वीट केलं आहे. ‘शबाना आझमी यांच्या अपघाताचं वृत्त वेदनादायी आहे. त्या लवकर बऱ्या होण्यासाठी मी प्रार्थना करतो,’ असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
The news of @AzmiShabana Ji’s injury in an accident is distressing. I pray for her quick recovery.
— Narendra Modi (@narendramodi) January 18, 2020
दरम्यान, पुण्याच्या दिशेला जाताना खालापूर येथे शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात झाला. खालापूर टोल नाक्याजवळ पुढे जाणाऱ्या ट्रकला शबाना आझमी यांच्या टाटा सफारी गाडीने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात शबाना आझमी यांच्यासह त्यांच्या गाडीचा चालकही जखमी झाला आहे. शबाना आझमी यांची प्रकृती ठीक होण्यासाठी देशभरातील मान्यवरांनी प्रार्थना केली आहे. ‘शबाना आझमी यांचा अपघात झाल्याचं कळाल्यानंतर वाईट वाटलं. त्यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना करते,’ असं ट्वीट गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केलं आहे.
Deeply upset after hearing Shabanaji was hurt in a car accident. My prayers for a speedy recovery.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) January 18, 2020
कोण आहेत शबाना आझमी? -शबाना आझमी यांचा जन्म 18 सप्टेंबर 1950 रोजी झाला -अंकुर या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण -आझमी यांनी आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये जवळपास 130 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले -जुनून, शतरंज के खिलाडी, कंधार, स्पर्श, पार, सती, अर्थ, गॉडमदर यासारख्या अनेक चित्रपटात काम - जॉन श्लेसिंगर यांचा मॅडम सोऊसाटस्का आणि रोनाल्ड जॉफ यांचा सिटी ऑफ जॉय या हॉलिवू़ड चित्रपटातही काम