पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. अनेक जुने चेहरे मंत्रिमंडळातून बाहेर पडले असून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा बदलला आहे.
या मंत्रिमंडळाचं स्वरूप सर्वसमावेशक ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. मंत्रिमंडळात सध्या 12 अनुसुचित जातींचे, 8 अनुसुचित जमातींचे, 27 ओबीसींचे तर 5 अल्पसंख्याक मंत्री आहेत.
नव्या मंत्रिमंडळात वेगवेगळ्या 9 राज्यांतील एकूण 11 महिला आहेत. त्यातील दोघींना कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
अनुसुचित जातींच्या 12 मंत्र्यांपैकी दोघांना, तरअनुसुचित जमातीच्या 8 पैकी 3 जणांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे.
नव्या मंत्रिमंडळाचं वय कमी झालं आहे. यापूर्वी मंत्रिमंडळाचं सरासरी वय 61 वर्षं होतं. तर नव्या चेहऱ्यांचं सरासरी वय 58 वर्षं आहे.
देशातील सर्व राज्यांना या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. राजकीय आणि प्रशासकीय अशा दोन्ही क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
फेरबदलानंतर आता 7 मंत्री डॉक्टरेट मिळवलेले, 3 एमबीए तर 68 मंत्री पदवीधर आहेत. शिवाय एकूण 13 वकील, 6 डॉक्टर आणि 5 मंत्री इंजिनिअर आहेत.