जयपूर 20 नोव्हेंबर : राजस्थानात मुख्यमंत्री (Rajasthan CM) अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळाच्या फेररचनेचं काउंटडाउन (Cabinet Expansion) सुरू झालं आहे. येत्या एक-दोन दिवसांत मंत्रिमंडळ फेररचना पूर्ण केली जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. 21 किंवा 22 नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळ फेररचना होणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, आज (20 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी पाच वाजता मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या मंत्रिमंडळ बैठकीत डॉ. रघू शर्मा, हरीश चौधरी, गोविंदसिंह डोटासरा आदींसह अनेक मंत्र्यांचे राजीनामे या बैठकीत घेतले जातील, असं सांगितलं जात आहे. राजस्थान काँग्रेसचे प्रदेश प्रभारी अजय माकन (Ajay Maken) यांचा जयपूर दौरा आणि त्यांच्या काही वक्तव्यांमधून या चर्चेला अधिकच चालना मिळाली आहे. माकन यांनी सांगितलं आहे, की मंत्री गोविंदसिंह डोटासरा, हरीश चौधरी आणि डॉ. रघू शर्मा यांनी काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहून राजीनामा सादर केला असून, पक्षसंघटनेसाठी काम करण्याची इच्छा पुन्हा व्यक्त केली आहे. याचाच अर्थ असा, की मंत्रिमंडळात तीन जागा रिक्त होणार आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 30 मंत्री असू शकतात. सध्या मुख्यमंत्र्यांसह 21 मंत्री राजस्थानच्या मंत्रिमंडळात आहेत. म्हणजे मंत्रिमंडळात आधीच 9 जागा रिक्त असून, त्यात तीन मंत्र्यांनी राजीनामे दिले, तर ती संख्या वाढून 12 होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फारसं काम न केलेल्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवून मंत्रिमंडळ फेररचनेत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ फेररचनेत निम्मे चेहरे नवे असतील. त्यामुळे कोणाला मंत्रिमंडळातून काढलं जाणार आणि नवे चेहरे कोणते असणार, याबद्दल कयास बांधले जाऊ लागले आहेत. असं मानलं जात आहे, की नव्या चेहऱ्यांमध्ये सचिन पायलट (Sachin Pilot) गटातल्या आमदारांची संख्या जास्त असेल. नव्या मंत्रिमंडळात यांचा समावेश होऊ शकतो. शकुंतला रावत – अलवरमधल्या बानसूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार – महिला काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद, राष्ट्रीय महासचिवपद सांभाळलं आहे. – महिला चेहरा म्हणून मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जाऊ शकतं. महेंद्रजितसिंह मालवीय – तीन वेळा आमदार होते आणि याआधी कॅबिनेट मंत्रिपद सांभाळलेलं आहे. – बांसवाडा जिल्ह्यातल्या बागीदौरा मतदारसंघातून आमदार – पक्षाचा दिग्गज आदिवासी चेहरा खिलाडीलाल बैरवा – धौलपूर जिल्ह्यातल्या बसेडी मतदारसंघाचे आमदार – पूर्वी लोकसभेचे खासदार होते. – SC वर्गाचं प्रतिनिधित्व म्हणून मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकतं. हेमाराम चौधरी – सहा वेळा आमदार होते आणि याआधी कॅबिनेट मंत्रीही होते. – बाडमेरच्या गुडामालानी मतदारसंघाचे आमदार – पायलट गट – जाट चेहरा म्हणून मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकतं. विश्वेंद्र सिंह – तीन वेळा आमदार होते आणि पूर्वी कॅबिनेट मंत्रीही होते. – राजकीय संकटामुळे मंत्रिपद सोडावं लागलं होतं. – पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जाऊ शकतं. – भरतपूरमधल्या डीग-कुम्हेर मतदारसंघातून आमदार आहेत. रामलाल जाट – चार वेळा आमदार आणि पूर्वी मंत्रीही होते. – भीलवाडामधल्या मांडल मतदारसंघाचे आमदार – जाट चेहरा आणि सीएम गेहलोत यांचे निकटवर्तीय गोविंदराम मेघवाल – बिकानेरमधल्या खाजूवाला मतदारसंघातून दोन वेळा आमदार – SC वर्गाचे प्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकतं. नरेंद्र बुडानिया – दोन वेळा आमदार – पूर्वी लोकसभा आणि राज्यसभा खासदार होते. – जाट चेहरा म्हणून कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. मुरारीलाल मीणा – पायलट गटातले असल्याने मंत्री म्हणून स्थान दिलं जाऊ शकतं. – एसटी वर्गातले मीणा तीन वेळा आमदार झाले आहेत. – पूर्वी मंत्रिपदही सांभाळलं आहे. डॉ. महेश जोशी – दोन वेळा आमदार आणि पूर्वी लोकसभा खासदार – जयपूरमधल्या हवामहल मतदारसंघातून आमदार – कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. बृजेंद्र सिंह ओला – तीन वेळा आमदार आणि पूर्वी मंत्रिपद सांभाळलेलं आहे. – पायलट गट डॉ. जितेंद्र सिंह – पाच वेळा आमदार आणि पूर्वी मंत्रिपद सांभाळलेलं आहे. – झुंझुनूमधल्या खेतडी मतदारसंघातून आमदार डॉ. राजकुमार शर्मा – झुंझुनूमधल्या नवलगढ मतदारसंघातून 3 वेळा आमदार – पूर्वी राज्यमंत्रिपद सांभाळलेलं आहे. राजेंद्रसिंह गुढा – बसपातून काँग्रेसमध्ये आलेल्या आमदारांपैकी एक – दोनवेळा आमदार आणि पूर्वी मंत्रिपद सांभाळलेलं आहे. रमेशचंद मीणा – करौलीमधल्या सपोटरा मतदारसंघातून तीन वेळा आमदार – पूर्वी कॅबिनेट मंत्रिपद सांभाळलेलं आहे. – राजकीय संकटादरम्यान मंत्रिपद सोडावं लागलं. – पायलट गट मंजू देवी - नागौरमधल्या जायल मतदारसंघातून 2 वेळा आमदार आणि पूर्वी मंत्रिपद सांभाळलेलं आहे. – SC वर्गातला महिला चेहरा म्हणून मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकतं. महादेव सिंह खंडेला – सहा वेळा आमदार आणि पूर्वी केंद्रीय मंत्रिपद सांभाळलेलं आहे. – अपक्ष आमदार आणि मुख्यमंत्री गेहलोत यांचे निकटवर्तीय – राजकीय संकटात साथ दिल्याबद्दल इनाम मिळू शकतं. बाबूलाल नागर – चार वेळा आमदार आणि पूर्वी मंत्रिपद सांभाळलेलं आहे. – अपक्ष आमदार आणि मुख्यमंत्री गेहलोत यांचे निकटवर्तीय – SC वर्गाचे प्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. या नावांचीही चर्चा याशिवाय आणखीही अशी काही नावं आहेत, की ज्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. कामा मतदारसंघाच्या आमदार जाहिदा खान, बांदीकुईचे आमदार गजराज खटाना, हिंडौनचे आमदार भरोसीलाल जाटव, पीपलदाचे आमदार रामनारायण मीणा, सांगोदचे आमदार भरतसिंह कुंदनपूर, नावाचे आमदार महेंद्र चौधरी, धरियावदचे आमदार नगराज मीणा, धोदचे आमदार परसराम मोरदिया, सीकरचे आमदार राजेंद्र पारीख, श्रीमाधोपूरचे आमदार दीपेंद्र सिंह आणि खेरवाडाचे आमदार दयाराम परमार आदींच्या नावांची चर्चा आहे. आता यांपैकी कोणाची निवड केली जाते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या मंत्रिमंडळ फेररचनेमध्ये जातीसोबतच पक्षनिष्ठा हा घटकही महत्त्वाचा ठरणार आहे. जवळपास 16 जिल्हे असे आहेत, की ज्यातला अद्याप एकही मंत्री नाही. या जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देण्याचा विचारही या वेळी केला जाईल. आज सायंकाळी होणार असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही विद्यमान मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाण्याची शक्यता असून, त्यानंतर मुख्यमंत्री गेहलोत राज्यपालांची भेट घेतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.