जाहिरात
मराठी बातम्या / देश / भारत-पाकिस्तानवर मोठं संकट येण्याची भीती, स्कॉटलंडच्या वैज्ञानिकांचा मोठा इशारा

भारत-पाकिस्तानवर मोठं संकट येण्याची भीती, स्कॉटलंडच्या वैज्ञानिकांचा मोठा इशारा

भारत-पाकिस्तानवर मोठं संकट येण्याची भीती, स्कॉटलंडच्या वैज्ञानिकांचा मोठा इशारा

हवामानतज्ज्ञ स्कॉट डंकन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर (Twitter Account) एका थ्रेडमध्ये म्हटलं आहे, की भारत-पाकिस्तानच्या दिशेनं धोकादायक अशी उष्णतेची लाट वाढत आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 29 एप्रिल : देशातल्या अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) आली आहे. वाढत्या उष्म्यामुळे नागरिक खूप हैराण झाले आहेत. अनेक भागांत पारा 40 ते 45 अंशांदरम्यान पोहोचला आहे. यंदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उन्हाच्या तीव्र झळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल महिन्यातदेखील स्थिती काही निराळी नव्हती. देशातल्या अनेक राज्यांमध्ये कमाल तापमानात (Maximum Temperature) लक्षणीय वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्येही (Pakistan) काहीशी अशीच स्थिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी मे आणि जून महिन्यातल्या हवामान स्थितीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या महिन्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचं हे संकट अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. येत्या मे आणि जून महिन्यात सध्याच्या तुलनेत अधिक उष्णता जाणवण्याची शक्यता आहे, असं हवामान तज्ज्ञांनी म्हटलं आहे. स्कॉटलंडमधील (Scotland) हवामान शास्त्रज्ञ स्कॉट डंकन (Scott Duncan) यांनी याबाबत इशारा देताना भारत आणि पाकिस्तानच्या दिशेनं अत्यंत धोकादायक अशी उष्णतेची लाट वाढत असल्याचं म्हटलं आहे. ‘टीव्ही नाइन हिंदी’ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. सध्या भारतातल्या अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्मा जाणवत आहे. अनेक भागांत उष्णतेची लाट आलेली आहे. येत्या मे आणि जून महिन्यात यापेक्षा अधिक तीव्र उष्णतेची लाट येऊ शकते, असा इशारा हवामानतज्ज्ञांनी दिला आहे. ‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, वीज आणि पाण्याची कमतरता जाणवण्यामागे हे एक प्रमुख कारण आहे. हवामानतज्ज्ञ स्कॉट डंकन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर (Twitter Account) एका थ्रेडमध्ये म्हटलं आहे, की भारत-पाकिस्तानच्या दिशेनं धोकादायक अशी उष्णतेची लाट वाढत आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, “येत्या काही दिवसांत तापमान उच्चांकी होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधल्या काही भागांत पारा 50 अंश सेल्सियसपर्यंत वाढू शकतो. यंदा उष्मा लवकर म्हणजेच मार्च महिन्यापासून जाणवू लागला आहे.” स्कॉट यांनी मार्च (2022) महिन्यात जगातल्या कोणत्या भागात उष्णतेची लाट जाणवली याचं ग्राफिक्सदेखील ट्विटरवरून शेअर केलं आहे. ( राणा दाम्पत्याला आणखी एक झटका, आमदार-खासदाराची विनंती कोर्टाने फेटाळली ) दरवर्षी सरासरी जागतिक तापमानात सुमारे एक अंश सेल्सियसने वाढ होत आहे. कोरोनामुळे जगभरातल्या अनेक देशांमध्ये कारखाने, प्रकल्प आदी बंद होते. रस्त्यांवरची वाहनंदेखील कमी झाली होती. तेव्हा कार्बन डाय ऑक्साइडच्या (Carbon dioxide) उत्सर्जनात (Emission) घट झाली होती. परंतु, निर्बंध हटवल्यानंतर यात उच्चांकी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. तापमान कमी होण्यासाठी डीकार्बोनायझेशन गरजेचं आहे, असं शास्त्रज्ञ सांगतात. जागतिक तापमानवाढीच्या समस्येवर जगभरात चर्चा, वाद-विवाद होत आहेत. या विषयावर विचारमंथन करण्यासाठी चर्चासत्रंही आयोजित केली जात आहेत. अनेक देशांनी या प्रश्नावर सामूहिक प्रयत्न सुरू केले असले, तरी अजूनही बऱ्याच गोष्टी करणं बाकी आहे. 19व्या शतकानंतर भारत (India), पाकिस्तान आणि आजूबाजूच्या प्रदेशांतल्या हवामानात बदल झाला आहे, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ स्कॉट डंकन यांनी दिली. ‘बर्कले अर्थ’च्या डेटाच्या आधारे त्यांनी ही माहिती दिली आहे. “जसजसं आपल्या ग्रहाचं तापमान वाढतं, तसतशी उष्णतेची लाटही अधिक तीव्र होते. या भागांमध्ये वर्षातला बहुतांश काळ सर्वाधिक उष्णता जाणवते”, असं स्कॉट यांनी म्हटलं आहे. जागतिक हवामान संघटनेनं याबाबत आधीच सांगितलं आहे. त्यानुसार, 2021 मध्ये नोंदवलेलं तापमान हे पृथ्वीवरच्या 7 सर्वांत उष्ण वर्षांपैकी एक होतं. येत्या काही वर्षांत काय होईल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात