नवी दिल्ली, 22 मे : कोरोना विषाणूवर इलाज येईपर्यंत देशांनी 50 दिवसांचा कठोर लॉकडाऊन आणि त्यानंतर 30 दिवसांनी टप्प्याटप्प्यात शिथिलता असा नियम पाळला पाहिजे, असा सल्ला वैज्ञानिकांनी दिला आहे. केम्ब्रिज विद्यापीठातील भारतीय वंशाचे संशोधक राजीव चौधरी आणि त्यांच्या पथकाने कोरोना व्हायरसचा विस्ताराने अभ्यास केल्यानंतर हे सूत्र सुचविले आहे. अभ्यासानुसार, कोणतीही सूट न घेता कठोर लॉकडाऊन 50 दिवस अवलंबले पाहिजे. यानंतर, सामाजिक अंतर आणि इतर नियमांसह 30 दिवस लॉकडाउन उघडले जावे, अशा प्रकारे,हे चक्र किमान दीड वर्ष अवलंबले पाहिजे तरच कोरोना व्हायरसचा तीव्र गतीच्या प्रसाराला रोखणे शक्य होणार आहे. सोबतच यामुळे कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता कमी होईल आणि अर्थव्यवस्था देखील हळू हळू सुरू राहील. युरोपियन जर्नल ऑफ एपिडेमिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार असा दावा करण्यात आला आहे की, जगातील सर्व देशांच्या सरकारांनी हा फॉर्म्युला अवलंबल्यास व्हायरसला सरासरी 0.8 टक्यापर्यंत पर्यंत रोखले जाऊ शकते. जागतिक स्तरावर कोरोना व्हायरसचे रोकथाम करण्याकरिता लस शोधण्याचे कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. काही देश मानवी चाचणी पर्यंत पोहचले आहे. त्यामुळे लवकरच ही लस प्राप्त होईल. पण आगामी सप्टेंबर महिन्यात लस मिळेल असा देखील दावा केला जात आहे. दरम्यान, जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाचा भारतातील फैलावही वाढला आहे.गेल्या दोन दिवसांपासून देशात रोज पाच हजारांहून अधिक रुग्णांची भर पडत असून, 24 तासांत 5 हजार 609 नवे रुग्ण आढळले आहेत. देशात पहिला रुग्ण 30 जानेवारी रोजी आढळला होता. त्यानंतर 45 दिवसांनी म्हणजे 15 मार्च रोजी भारतातील करोनाबाधितांची संख्या 100 वर पोहोचली. तर भारताने एक हजाराचा टप्पा अधिक वेगाने म्हणजे 29 मार्च रोजी गाठला तर 13एप्रिलपर्यंत बाधितांची संख्या 10 हजारांवर गेली. 6 मे रोजी बाधितांची संख्या 50 हजारांवर पोहोचली तर बाधितांची संख्या एक लाखावर पोहोचण्यासाठी दोन आठवडय़ांहून कमी कालावधी लागला. जागतिक पातळीवर बाधितांची संख्या 50 लाखांवर पोहोचली आहे तर तर 3.3 लाख जणांचा मृत्यू झाला आहे आणि 19 लाखांहून अधिक जण बरे झाले आहेत. संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







