काँग्रेस नेते कमलनाथ यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. पण त्याचवेळी राज्यात ठिकठिकाणी लागलेले संजय गांधी यांचे पोस्टर्सदेखील सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
कमलनाथ यांच्या शपथविधीप्रमाणेच राज्यातील अनेक ठिकाणी झळकत असलेले संजय गांधींचे पोस्टर्सदेखील मध्य प्रदेशात चर्चेचा विषय झाला आहे.
संजय गांधी हे कमलनाथ यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून मित्र होते. संजय गांधींमुळेच कमलनाथ यांचा राजकारणात प्रवेश झाला.
कमलनाथ यांना राष्ट्रीय राजकारणातही अनेक मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यामागे संजय गांधीच होते, असं बोललं जातं.
कमलनाथ हे मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासूनच राज्यात संजय गांधींचे वेगवेगळ्या कार्यक्रमात फोटो लागायला सुरूवात झाली होती.
अनेक वर्ष सत्तेतून बाहेर राहिल्यानंतर 72 वर्षांचे कमलनाथ पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आले आहेत. 15 वर्षांचा वनवास संपवून त्यांनी काँग्रेसल मध्य प्रदेशात सत्ता मिळवून दिली. राज्यांचे मुख्यमंत्री म्हणून आता त्यांना पाच वर्ष काँग्रेसची लोकप्रियता टिकवून ठेवावी लागणार आहे.
गांधी घराण्याशी एकनिष्ठ असणाऱ्या कमलनाथ यांची राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकून काँग्रेसला राज्यात पुन्हा उभारी मिळवून दिली.
कानपूरला संपन्न परिवारात त्यांचा जन्म झाला. कमलनाथ यांचे शिक्षण जगप्रसिद्ध डुन स्कूलमध्ये झालं. तिथेच त्यांची संजय गांधी यांच्याशी ओळख झाली. पुढे ते जिगरी दोस्त झाले. त्यांची ही मैत्री एवढी घट्ट होती की इंदिरा गांधी या कमलनाथ यांना आपला तिसरा मुलगाच मानत होत्या. संजय गांधी एवढच त्यांचं कमलनाथ यांच्यावरही प्रेम होतं. त्यावेळी एक घोषणा प्रसिद्ध होती, इंदिरा गांधी एक दो हाथ एक संजय और एक कमलनाथ
वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर संजय गांधी यांच्यासोबत कामाला सुरूवात केली. संजय गांधी ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गटाचे ते सक्रिय सदस्य होते.
कमलनाथ यांच्याबाबत एक गोष्ट सांगितली जाते की गेल्या 30 वर्षात त्यांच्यातल्या च्युइंगम खाणं, दुर्मिळ आगपेट्या जमविणं आणि गांधी घराण्याप्रती निष्ठा या तीन गोष्टी कधीच बदलल्या नाहीत. 1975 मध्ये आणिबाणि लादल्यानंतरही त्यांनी कमलनाथ यांनी संजय गांधी यांची कधीच साथ सोडली नाही. आणीबाणीचे कट्टर समर्थक होते. त्यावेळच्या सर्व वादग्रस्त उपक्रमात त्यांनी संजय गांधींची मदत केली.
1977 मध्ये जेव्हा देशात जनता पक्षाचं सरकार आलं त्यानंतर संजय गांधी यांना जेलमध्ये जावं लागलं. तेव्हा इंदिरा गांधी या संजय यांच्या सुरक्षेबाबत चिंताग्रस्त होत्या तेव्हा कमलनाथ यांनी नाट्यमयपद्धतीनं तिहारमध्ये प्रवेश मिळवला आणि संजय गांधींची सोबत केली.
तिहारमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी त्यांनी वकिलामार्फत एक योजना तयार केली. एका प्रकरणात कोर्टात गेले असताना त्यांनी न्यायाधिशांवर कागदाचे बोळे फेकून मारले. तरीही न्यायाधीश शिक्षा देत नाहीत असं दिसल्यावर त्यांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. शेवटी न्यायाधीशांनी त्यांना 500 रुपये दंड ठोठावला. तेव्हा त्यांनी दंड भरायला नकार दिला आणि त्यांची रवानगी जेलमध्ये झाली.
नंतरच्या काळात ते केंद्रात मंत्री झाले. राजीव गांधी सोबतही त्यांची मैत्री होती. नंतर सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी यांच्याशीही त्यांनी चांगलं जमवून घेतलं आणि आता त्याचं त्यांना फळही मिळालं.पुढे बघा सचिन पायलट यांची 'लव्ह स्टोरी'
काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांना सार्वजनिक जीवनात सगळे लोक ओळखतात. पण काँग्रेसच्या या तरुण नेत्याचं आयुष्य एखाद्या सिनेमासारखंच आहे.त्यांच्या कहाणीची नायिका आहे सारा पायलट. या दोघांची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश पायलटचे पुत्र सचिन पायलट आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सारा यांच्या प्रेमकहाणीत धर्माची भिंत आड येत होती. ती या प्रेमींनी प्रेमानं पाडली.
सचिन आणि साराची पहिली नजरा नजर परदेशात शिकत असताना झाली. काश्मीरची सौंदर्यवती साराला पाहून सचिन पायलट प्रेमातच पडले.
शिक्षण पूर्ण करून सचिन परत दिल्लीत आले आणि सारा तिथेच इंग्लंडला राहिल्या. पण फोनवर दोघं तासनतास बोलायचे आणि सरते शेवटी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
भले दोघांचं घराण राजकारणात होतं, पण धर्माची भिंत दोघांच्या मधे आली. दोघांचं कुटुंब या लग्नाला अजिबात तयार नव्हतं.
अखेर 2004मध्ये सचिन आणि सारा यांनी लग्न केलं. पण या लग्नाला साराचे वडील फारुख अब्दुल्ला उपस्थित राहिले नाहीत.