जयपूर 20 जुलै: राजस्थानच्या राजकारणाने आता नवं वळण घेतलं. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बंडखोर नेते सचिन पायलट यांच्यावर अतिश घणाघाती आरोप केलेत. पायलट हे धोकेबाज, बिनकामाचे, टुकार आहेत अशी टीका त्यांनी केली होती. तर काँग्रेसच्या एका आमदाराने पायलट यांच्यावर भाजपकडून 35 कोटी घेतल्याचा आरोप केला होता. त्यावर सचिन पायलट भडकले आहेत. त्यांनी काँग्रेसवर पलटवार करत गंभीर आरोप केला आहे. पायलट म्हणाले, माझी प्रतिमा मलिन करण्यासाठीच हे आरोप करण्यात येत आहेत. मी धोकेबाज असल्याचा काँग्रेसला आज साक्षात्कार झाला का असा सवालही त्यांनी केला. काँग्रेसचे आमदार गिरीराज सिंह मलिंगा यांनी पायलट यांच्यावर 35 कोटी घेतल्याचा आरोप केला होता. त्यावरही त्यांनी कडक भूमिका घेतली. सिंह यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, राजस्थानच्या वादात आणि जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा प्रवेश झाला आहे. छत्तिसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी सचिन पायलट यांच्या बंडाला ओमर आणि फारुख अब्दुल्ला यांची फुस असल्याचा आरोप केला होता. त्यावर ओमर यांनी बघेल यांच्यावर आरोप करत कायदेशीर नोटीस देणार असल्याचं सांगितलं. आता माझ्या वकिलांनाच उत्तर द्या असंही ते म्हणाले. राजस्थानमधला वाद आता कोर्टात पोहोचला असून कोर्टात त्यावर सुनावणीही सुरू आहे. कोर्टा त्यावर काय निर्णय देतं यावर पुढचं भवितव्य अवलंबून असणार आहे.