Home /News /national /

नितीन गडकरी चिंतेत, रस्ते अपघाताबाबत दिला धोक्याचा इशारा

नितीन गडकरी चिंतेत, रस्ते अपघाताबाबत दिला धोक्याचा इशारा

देशभरातल्या वाढत्या रस्ते अपघातांबाबत (Road Accident in India) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी चिंता व्यक्त केली आहे.

    नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : देशभरात रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूच्या बातम्या आपण दररोज वाचतो, पण तरीही या दुर्घटना कमी होताना दिसत नाहीत. भारतातल्या या रस्ते अपघातांबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे. भारतात दररोज जवळपास 415 जणांचा रस्ते अपघातात (Road Accidents) मृत्यू होतो. त्यापैकी बहुतांश जण 18 ते 45 वयोगटातील असतात. दरवर्षी 1.5 लाख जणांना रस्ते अपघातात प्राण गमवावे लागतात तर 4.5 लाख लोक जखमी होतात. सध्या भारत रस्ते अपघातात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करायला हवी,’ असा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिला आहे. इंटरनॅशनल रोड फेडरेशनच्या वतीने आयोजित ‘रोड सेफ्टी चॅलेंजेस इन इंडिया अँड प्रिपरेशन ऑफ ॲन ॲक्शन’ या विषयावरील वेबिनारमध्ये गडकरी बोलत होते. केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने रस्ते सुरक्षा महिना साजरा केला जात आहे. त्याअंतर्गत जनजागृतीसाठी 12 वेबिनार आयोजित केले जाणार आहेत. या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, 'रस्ते अपघातांमधील मृत्यूंची संख्या ही गंभीर चिंतेची बाब आहे. 2025 पर्यंत आपण अपघातांचं प्रमाण 50 टक्क्यांनी कमी करण्याची गरज आहे. त्यासाठी या विषयाशी संबंधित सर्वांनीच एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत'. भारताचा पहिला क्रमांक 'रस्ते अपघातांमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिका आणि चीनपेक्षाही वाईट परिस्थिती भारतात आहे. देशात दररोज 415 जणांना रस्ते अपघातांत प्राण गमवावे लागतात. या अपघातांमुळे राष्ट्रीय जीडीपीचं 3.14 टक्के सामाजिक आर्थिक नुकसान होतं. सगळ्यात वाईट म्हणजे 70 टक्के अपघातांमध्ये मरण पावणारे 18 ते 45 या वयोगटातील असतात. या अपघातांची कारणं शोधण्याचं काम सातत्यानी सुरू आहे. रस्ते बांधतानाचं इंजिनीअरिंग, शिक्षण, अंमलबजावणी आणि आपत्कालीन मदत या गोष्टी अधिक चांगल्या केल्या जात आहेत. महामार्गांवरील 5000 पेक्षा जास्त अपघातप्रवण क्षेत्र (Black Spot) शोधून तिथे सुधारणा केल्या जात आहेत. 40 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं ऑडिट केलं जात आहे', असं गडकरींनी सांगितलं. सर्वांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे 'रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने सर्व राज्यांसमोर एक प्रस्ताव ठेवला असून, त्याअंतर्गत रस्ते सुरक्षा कार्यक्रमाला पाठिंबा देणाऱ्या राज्याला 14 हजार कोटी रुपयांचा इन्सेंटिव्ह देण्यात येईल. रस्ते सुरक्षा ही एक सामूहिक जबाबदारी आहे त्यामुळे केंद्र, राज्य सरकार आणि या विषयाशी संबंधित सर्व भागधारकांनी ब्लॉक स्तरापासून तालुका स्तरापर्यंत एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे,' असंही गडकरी म्हणाले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Nitin gadkari, Road accident, Road accidents in india

    पुढील बातम्या