नवी दिल्ली, 18 जानेवारी: भारतीय हवाई दलात नुकताच सामील झालेला राफेल लढाऊ विमान 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सामील होणार आहे. यादिवशी फ्लायपास्ट समारोपच्या वेळी हे विमान 'व्हर्टिकल चार्ली फॉर्मेशन' मध्ये उड्डाण भरणार आहे. त्यामुळे पूर्ण देशवासीयांना या विमानाची आकाशातली जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. अशी माहिती सोमवारी भारतीय हवाई दलाने दिली आहे.
'व्हर्टिकल चार्ली फॉर्मेशन' म्हणजे विमान कमी उंचीवर उड्डाण करते, सरळ वर जाते. त्यानंतर आकाशात विविध कसरती केल्या जातात आणि नंतर एका उंचीवर स्थिर होते. विंग कमांडर इंद्रनील नंदी म्हणाले की, राफेल विमानाने "व्हर्टिकल चार्ली फॉर्मेशन' केल्यानंतर फ्लायपास्टचा समारोप होईल." ते पुढे म्हणाले की, 26 जानेवारीला फ्लायपास्टमध्ये हवाई दलाची एकूण 38 विमानं आणि भारतीय सैन्याची चार विमानं सहभागी होतील.
या गोष्टींवर असेल बंदी
यापूर्वी, अशी बातमी आली होती की, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजधानीत मानव रहित विमानं, पॅराग्लायडर आणि हॉट बलून उडवण्यास बंदी घातली आहे. हा आदेश 20 जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी दिली. पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी जारी केलेल्या आदेशात असं म्हटलं आहे की, हा आदेश 20 जानेवारीपासून अंमलात येईल. या आदेशाची अंमलबजावणी पुढील 27 दिवस म्हणजे 15 फेब्रुवारीपर्यंत लागू असणार आहे.
या आदेशात पुढे असंही म्हटलं आहे की, काही गुन्हेगार, असामाजिक घटक किंवा भारतविरोधी दहशतवादी पॅरा ग्लायडर्स, पॅरा मोटर, हँग ग्लाइडर्स, मानव रहित विमान आदी साधनांच्या माध्यमातून हे लोकं सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जाऊ शकतं. तसेच देशातील महत्त्वाच्या पदावरील लोकांच्या सुरक्षेस धोकाही निर्माण केला जाऊ शकतो. म्हणूनच, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अशा पारंपरिक बाबी आकाशात उडवण्यास बंदी घातली आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिल्ली. या नियमांच उल्लंघन करणाऱ्या लोंकावर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अंतर्गत कारवाई केली जाईल, असंही दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rafale fighter jet, Republic Day