नवी दिल्ली, 02 जून: देशात अन्नधान्य महागाई (Food Inflation) उच्च पातळीवर पोहोचली आहे. त्यातच गतवर्षभरात प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोच्या (Tomato) किमती दुपटीने वाढल्या आहे. दिल्लीत गेल्या वर्षी टोमॅटोचे किरकोळ दर 15 रुपये प्रतिकिलो होते. त्या तुलनेत सध्या हे दर 39 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, मुंबईत टोमॅटोचा दर गगनाला भिडला आहे. सध्या मुंबईत टोमॅटो 77 रुपये किलो आहेत गेल्यावर्षी ते 28 रुपये होते. कोलकता येथे गेल्यावर्षी 38 रुपये किलोने मिळणारे टोमॅटो आता 77 रुपये किलो दराने मिळत आहेत. रांचीमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत टोमॅटोचा दर 30 रुपयांनी वाढून 50 रुपये किलो झाला आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकसारख्या प्रमुख उत्पादक राज्यांमधून पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे टोमॅटोच्या किरकोळ किमतीत वाढ होत आहे, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं. प्रमुख भाजीपाल्यापैकी एक असलेल्या बटाट्याचा (Potato) दर 1 जून 2021 रोजी 20 रुपये प्रतिकिलो होता. तो आज रोजी 22 रुपये प्रतिकिलो आहे. डाटानुसार, मुंबईत गेल्या वर्षी बटाट्याचा दर 21 रुपये प्रतिकिलो होता. तोच दर सध्या 27 रुपये प्रतिकिलो आहे. कोलकात्यात गतवर्षी 16 रुपये प्रतिकिलो असलेला बटाट्याचा दर सध्या 27 रुपये प्रतिकिलो वर पोहोचला आहे. रांचीमध्ये सध्या बटाटा प्रतिकिलो 20 रुपये आहे तो गेल्यावर्षी 17 रुपये होता. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत आता कांद्याचे भाव कमी झाले आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या (Ministry of Consumer Affairs) डाटानुसार, 1 जून 22 रोजी दिल्लीत कांद्याचे (Onion) दर 24 रुपये प्रतिकिलो होते. हेच दर 1 जून 2021 रोजी 28 रुपये प्रतिकिलो होते. सध्या मुंबईत कांद्याचे दर 18 रुपये प्रतिकिलो आहेत. मागील वर्षी हाच दर 25 रुपये प्रतिकिलो होता. कोलकत्यात गेल्यावर्षी कांदा 27 रुपये प्रतिकिलो होता तो आता 23 रुपये प्रतिकिलो आहे. रांचीमध्ये गतवर्षी कांद्याचे दर 25 रुपये प्रतिकिलो होते. सध्या कांदा 18 रुपये प्रतिकिलो आहे. एमके ग्लोबल फायनॅन्शियल सर्व्हिसेसच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ माधवी अरोरा यांनी सांगितलं, ‘अन्नधान्य महागाईमुळे (8.4 टक्के ईयर-टू-ईयर, 1.6 टक्के मंथ-टू मंथ) एप्रिल महिन्यातील किरकोळ महागाईत (Retail Inflation) वाढ झाली आहे. फळं, खाद्यतेलं आणि तृणधान्यांमुळे ही 17 महिन्यांतील सर्वोच्च स्थिती आहे. पुढील हंगामात फळांचे दर बदलू शकतात. परंतु, इंडोनेशियातली बंदी आणि उष्णतेच्या लाटेमुळे खाद्यतेलं आणि तृणधान्य यांचे दर वाढू शकतात. डाळी, साखर आणि भाजीपाल्याचे दर सातत्याने कमी असले तरी आगामी महिन्यात भाज्यांच्या किमतींवर काहीसा दबाव दिसून येईल. तसंच अन्य नाशवंत वस्तूंचे दरही जास्त राहतील, असं मार्केटमधल्या किंमतीवरून दिसतं.’ ‘उन्हाळ्यात अन्नधान्यांच्या किमतींमध्ये हंगामी वाढ दिसली, मात्र, वाहतूक खर्चात वाढ झाल्याने या किमतींमध्ये आणखी वाढ होऊ शकते,’ असं अरोरा यांनी सांगितलं. ``ऊर्जा चलनवाढ (Energy Inflation) 10.8 टक्के (3.5 मंथ-टू-मंथ) असून, त्याचा लक्षणीय परिणाम तेलाच्या किमतींवर दिसत आहे. तसंच स्वयंपाकाचा गॅस आणि केरोसीनच्या दरांमध्येही झपाट्यानं वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये विजेचे दर वाढले आहेत. राज्यांनी प्रस्तावित दरवाढ लागू केल्यास, यात आणखी वाढ होऊ शकते,`` असं अरोरा म्हणाल्या. ग्राहक किंमत निर्देशांकावर ( Consumer Price Index- CPI) आधारित किरकोळ महागाई एप्रिल 2021 मधल्या 4.23 टक्के आणि मार्च 2022 मधल्या 6.97 टक्क्यांच्या तुलनेत एप्रिलमध्ये गेल्या आठ वर्षांतल्या उच्चांकी पातळीवर म्हणजेच 7.79 टक्क्यांवर पोहोचली आहे. फूड बास्केटमधली महागाई एप्रिलमध्ये 8.38 टक्क्यांवर पोहोचली आहे. ही महागाई मागील महिन्यात 7.68 टक्के आणि वर्षभरापूर्वी याच महिन्यात 1.96 टक्के होती. रिटेल चलनवाढ `आरबीआय`च्या (RBI) 2-6 टक्क्यांच्या लक्ष्य मर्यादेपेक्षा जास्त आहे. देशातील वाढती महागाई `आरबीआय`च्या चलनविषयक धोरण समितीला (Monetary Policy Committee) दर वाढीसाठी भाग पाडत आहे. `एमपीसी`ची आगामी बैठक 6 ते 8 जून दरम्यान होणार आहे. त्यानंतर नागरिकांना काही दिलासा मिळू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.