जाहिरात
मराठी बातम्या / देश / KGF ची खरी कहाणी: एकेकाळी भारताचं ‘इंग्लंड’ म्हणवलं जाणाऱ्या ठिकाणाची आज आहे ‘ही’ अवस्था

KGF ची खरी कहाणी: एकेकाळी भारताचं ‘इंग्लंड’ म्हणवलं जाणाऱ्या ठिकाणाची आज आहे ‘ही’ अवस्था

kgf

kgf

‘आयुष्यात दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. एक पाणी आणि दुसरं सोनं. पाण्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. सोनं आपण खाऊ शकत नाही किंवा पिऊ शकत नाही, आंघोळीसाठी त्याचा उपयोग होत नाही किंवा काही धुण्यासाठीही त्याचा उपयोग होत नाही. पण तरीही सोन्याला किंमत आहे पाण्याला नाही.’ हा डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाला होता. पण खऱ्या केजीएफचा मात्र याच सोन्याच्या भावामुळे अक्षरश: नाश झाला

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 18 एप्रिल: केजीफ(KGF) या चित्रपटाच्या दुसऱ्या भागानंही धमाल उडवून दिली आहे. वास्तवातलं KGF एकेकाळी ब्रिटिशांमध्ये अशाच प्रकारे लोकप्रिय होतं. या चित्रपटाबद्दल बोलताना अभिषेक बच्चन याच्या ‘द बिग बुल’ चित्रपटातील एक डायलॉग आठवतो. ‘आयुष्यात दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. एक पाणी आणि दुसरं सोनं. पाण्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. सोनं आपण खाऊ शकत नाही किंवा पिऊ शकत नाही, आंघोळीसाठी त्याचा उपयोग होत नाही किंवा काही धुण्यासाठीही त्याचा उपयोग होत नाही. पण तरीही सोन्याला किंमत आहे पाण्याला नाही.’ हा डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाला होता. पण खऱ्या केजीएफचा मात्र याच सोन्याच्या भावामुळे अक्षरश: नाश झाला. गेल्या 21 वर्षांपासून केजीएफ बंद पडलं आहे. KGF म्हणजे कोलार गोल्ड फिल्ड (Kolar Gold Field). बंगळुरुपासून (Benguluru) जवळपास 100 किमी अंतरावर असलेल्या या शहराची कहाणी म्हणजेच खऱ्या केजीएफची कहाणी आहे. जिथं सगळ्यांत सुरुवातीला वीज पोहोचली असं हे आशियातील दुसरं आणि भारतातलं पहिलं शहर होतं. इथं काम करणाऱ्यांना काहीही त्रास होऊ नये म्हणून ब्रिटिश सरकारनं इथं एक आर्टिफिशियल तळं बांधलं होतं. हे तळं आजही इथंच आहे आणि इथं येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचं एक मुख्य केंद्र आहे. एकेकाळी एकावेळेस इथं 40 हजार कर्मचारी काम करत असायचे आणि त्यांची कुटुंबही इथं जवळपासच राहतात. वीज-पाण्याचा पुरवठा म्हणजे व्हीव्हीआयपी सुविधा असण्याच्या काळातील ही गोष्ट आहे. KGF फिल्म आज करोडो रुपयांची कमाई करत आहे. त्याचप्रमामे 1900 च्या दशकाच्या आधी केजीएफमधून सोन्याचं उत्पादन होत असे. त्याकाळी केजीएफमधून भारतातील सोन्यापैकी 95 टक्के सोन्याचं उत्पादन होत असे अशी माहिती भूवैज्ञानिक एम. एस. मुनीस्वामी यांनी न्यूज18 ला दिली. त्या काळात सोनं उत्पादनात (Gold Production) भारत जगभरात सहाव्या क्रमांकावर पोहोचला होता. या परिसरात वीज पोहोचली होती. शिवनसमुद्रमध्ये बांधण्यात आलेल्या कावेरी वीज केंद्रातून इथं विजेचा पुरवठा होत असे. हा वीजपुरवठा अखंड होत असे. इथं कधीही वीज जात नव्हती. हा परिसर थंड हवेचा असल्यानं ब्रिटिशांना राहण्यासाठी अत्यंत योग्य होता. सोन्यामधून चांगलं उत्पन्नही मिळत होतं. त्याचवेळेस इथला विकासही होऊ लागला होता. ब्रिटिश इंजिनीअर्स, अधिकाऱ्यांसोबतच इथं सोन्याचे करार करणाऱ्यांसाठीही बंगले, हॉस्पिटल्स, शाळांपासून अगदी क्लबपर्यंत सगळ्या सोयीसुविधा होत्या. इथं मोठमोठे गोल्फ कोर्सही बांधण्यात आले होते. इथं इतका विकास झाला होता की, या भागाला भारताचं ‘इंग्लंड’ (India’s England) म्हणून ओळखलं जायचं. ‘जोपर्यंत इथं खाणकाम सुरु होतं तोपर्यंत इथं कधीही वीज गेली नाही, पाण्याची कमतरता जाणवली नाही. पण आज मात्र इथं वीजपुरवठाही नीट नाही आणि साधं पिण्यासाठीही पुरेसं पाणी उपलब्ध नाही,’ (No Facilities) असं इथं 75 वर्षांपासून राहणारे एम. विन्यास यांनी न्यूज18 ला सांगितलं. इथं काम करणाऱ्या मजुरांना अत्यंत दारिद्र्यात जगावं लागत आहे. या भागात साधारणपणे 2.5 लाखांपेक्षाही जास्तच लोक राहतात. पण त्यांच्याकडे राहण्यासाठी नीट छप्पर असलेलं घरही नाही किंवा कोणतीही सुविधाही त्यांना मिळत नाही. त्याशिवाय खाणकामाच्या कचऱ्यामुळे इथलें पर्यावरणही अत्यंत प्रदुषित (Polluted Environment) झालं आहे. त्यामुळे इथल्या लोकांना अनेक आजारपणं सोसावी लागतात. त्यामुळेच इथले अनेक लोक नोकरीसाठी बंगळुरुला जातात असंही त्यांनी सांगितलं. पण एकेकाळी इथं राहणाऱ्यांची दोन विश्वं होती. एक बड्या लोकांचं आणि दुसरं विश्व होतं इथल्या खाणींमध्ये काम करणाऱ्या भारतीय मजुरांचं. या बड्या लोकांचं जग अगदी इंग्लंडसारखं होतं; पण मजुरांचं जग मात्र 100-100 स्क्वेअर फुटांच्या खोलीत बंदिस्त होतं. अशा 400 खोल्यांमध्ये तिथे मजूर राहायचे. त्यांच्यासाठी टॉयलेटची सुविधा नव्हती किंवा सांडपाण्याची नीट व्यवस्थाही नव्हती. इथं उंदरांचा इतका सुळसुळाट असायचा की एका वर्षभरामध्ये इथले रहिवासी साधरणपणे एक हजार तरी उंदीर मारायचे. अर्थात इथं काम करणाऱ्यांकडे एक ठाम रोजगार म्हणजेच उत्पन्नाचं साधन होतं. 2001 साली तेही काढून घेण्यात आलं. 121 वर्षं सुरु असलेल्या या KGF ला सरकारनं बंद केलं (KGF Closed in 2001). खोदकामासाठी येणारा खर्च हा त्यातून होणाऱ्या उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त असल्याचं कारण यासाठी देण्यात आलं. सरकार हे ओझं सहन करु शकलं नाही. त्यातच त्याकाळी सोन्याच्या भावात कमालीची घट झाली. अशा परिस्थितीत जवळपास 30 हजार कर्मचाऱ्यांची जबाबदारी उचलणं शक्य नव्हतं. त्यामुळे सरकारनं खाण बंद करून टाकली. इथं राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती आणखीनच बिघडली. आता त्यांच्याकडे नोकरीही नव्हती आणि राहण्यासाठी घरंही राहिली नाहीत. त्याशिवाय खाणीत काम करणाऱ्या मजुरांना अनेक आजारांनी ग्रासलं होतं. त्यांना फुफ्फुसाचे आजार (Lung Disease ),कॅन्सर (Cancer), लिव्हर कॅन्सर (Liver Cancer) आणि सिलिकॉसिससारख्या (Silicosis) रोगांनी पोखरलं होतं. आता या परिसरात चांगला वीज पुरवठाही नाही आणि पाणी पुरवठाही नाही. लोक उघड्यावरच शौचास जातात. खाणीमुळे इथं सायनाईड हिल्स तयार झालेत. त्यावरून येणारी हवा आणि पाणी यामुळे इथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. 2001 साली इथली खाण बंद झाली तेव्हा हजारो मजूर रस्त्यांवर उतरले. ज्या मजुरांची आधीच नोकरी गेली होती त्यांचीही साथ त्यांना मिळाली. त्यानंतर सरकारनं मजुरांशी चर्चा करून त्यांना वेगवेगळ्या पॅरामीटर्समध्ये पेन्शन आणि मोबदला दिला; पण हा मोबदला अत्यंत तुटपुंजा असल्याचं मजुरांचं म्हणणं आहे. हा मोबदला त्यांच्या अयुष्यभरासाठी अजिबातच पुरेसा नव्हता, असं मजुराचं म्हणणं होतं. KGF मध्ये आताही 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचं सोनं आहे. 20 वर्षांपासून तिथं खाणकाम झालेलं नाही. जवळपास 12,500 एकर क्षेत्रात पसरलेल्या या भागाच्या अर्ध्या भागातच खोदकाम झालेलं आहे. अर्ध्या भागातलं सोनं अजूनही तिथंच आहे. 2001 मध्ये जेव्हा खाण बंद झाली तेव्हा इथल्या संपत्तीची मोजणी झाली. ती 4.1 करोड डॉलर्स इतकी भरली होती अशी माहिती आहे. अर्थात त्यावेळेस एक टन माती खोदण्यासाठी 11,000 रुपये असा दर होता आणि सोन्याचा भाव 3 हजार रुपये प्रति ग्राम होता. अशा परिस्थितीत खाण बंद करणं हेच सरकारला योग्य वाटलं. 1956 साली केंद्र सरकारनं केजीएफवरील नियंत्रण त्यांच्या हातात ठेवलं. बहुतांश खाणींची मालकी राज्य सरकारकडे देण्यात आली. त्याचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं. पण त्याचदरम्यान, KGF म्हणजे तोट्यातला व्यवहार असल्याचं सिध्द होऊ लागलं. 1979 नंतर तर मजुरांचं वेतनही देणं अवघड झालं. हा तोटा सातत्यानं वाढत होता. अखेर 2001 मध्ये ते बंद करण्यात आलं. एकेकाळी खरोखरंच सोन्याची भूमी असलेलं केजीएफ आता मात्र भकास झालं आहे. इथल्या खाणींमध्ये आता पाणी भरलं आहे. 2016 साली केंद्र सरकारनं राज्य सरकारशी याच्या पुनर्विकासाबद्दल चर्चाही सुरु केली होती. त्या दिशेनं काही काम सुरुही झालं होतं. पण अजूनपर्यंत ठोस पावलं मात्र उचलली गेली नाहीत. एकेकाळी समृध्दीचं आगार असलेलं केजीएफ आता मात्र मरणासन्न अवस्थेत आहे. पण तिथल्या लोकांसाठी तरी काहीतरी लवकरात लवकर उपाययोजना करणं आवश्यक आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात